धाराशिव : राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेतन आणि भत्त्यांच्या थकबाकीच्या मागणीसाठी ५ मार्च रोजी सर्व आगार आणि विभागीय कार्यालयांच्या मुख्य द्वारावर आंदोलन छेडण्यात येणार आहे.
महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने सांगितले की, जर या निदर्शनांची दखल एसटी महामंडळ आणि राज्य सरकारने घेतली नाही, तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल. यामुळे ऐन होळीच्या तोंडावर एसटी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
थकबाकी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी
एसटी कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ या कालावधीतील थकबाकी अद्याप मिळालेली नाही. तसेच, २०१८ पासूनच्या महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत न्यायालयाने निर्णय दिला असला, तरीही ती रक्कम अजूनही अदा करण्यात आलेली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.
वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी निर्णायक लढा देण्याच्या तयारीत असून आंदोलनाची व्याप्ती वाढल्यास राज्यातील एसटी सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. विशेषतः होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने उपाययोजना करून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.