तुळजापूर: तिर्थक्षेत्र आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत यात्रा मैदानासाठी राखीव असलेल्या सात एकर जागेच्या संरक्षणासाठी महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पालकमंत्र्यांना निवेदन देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने उद्यापासून (३ मार्च) तुळजापूर तहसील कार्यालयासमोर असंख्य महिलांनी आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारचा ठराव, पण अंमलबजावणी शून्य!
१९८९ साली शासनाने यात्रा मैदानासाठी सात एकर जागा राखीव ठेवली होती. त्यासाठी १२ लाख रुपये मंजूर करून ३.४८ लाख भरपाई देण्यात आली होती. मात्र, सत्तांतरानंतर ठराव बदलण्यात आला आणि फेरफार गायब झाले. यानंतर डुप्लिकेट पीआर कार्ड तयार करून काही प्लॉट विक्री केल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे.
जमीन हडपण्याचा ‘मास्टर प्लॅन’
महिलांच्या म्हणण्यानुसार, शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन हडपण्याचा मोठा मास्टर प्लॅन राबवला गेला. परिणामी, सात एकरपैकी केवळ तीन एकर मोकळी जागा उरली असून, उर्वरित जागेवर मोठ्या प्रमाणावर इमारती उभ्या राहिल्या आहेत.
महिलांचा संघर्ष – आता निर्णायक लढा!
ही परिस्थिती पाहून कमानवेस भागातील महिलांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त महिलांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. “शासनाला यात्रा मैदानाची जागा वाचवायची नसेल, तर आम्हीच न्याय मिळवू,” असा ठाम निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे.
पालकमंत्र्यांचे आश्वासन हवेत?
महिलांनी यापूर्वी पालकमंत्र्यांना निवेदन दिले होते. मात्र, त्याला १०-१५ दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी उद्यापासून तहसील कार्यालयासमोरच उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
“लढा सुरूच राहील!”
महिलांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत महाराष्ट्र शासन यात्रा मैदानाची जागा मुक्त करत नाही, तोपर्यंत त्यांचे आमरण उपोषण सुरूच राहील. प्रशासन आता यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तुळजापूरचे लक्ष लागले आहे.