पत्रकारिता म्हणजे सत्याचा निर्धार! सत्यासाठी लढणाऱ्या धाराशिव लाइव्ह आणि संपादक सुनील ढेपे यांच्याविरुद्ध पुन्हा एकदा कटकारस्थान रचण्यात आले. मात्र, खोट्या प्रचाराचा हा डाव उघड झाला आणि षड्यंत्रकर्त्यांचे तोंड काळे झाले!
बनावट पत्राचा फसवा खेळ
आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या जुन्या लेटरपॅडवर धाराशिव लाइव्ह आणि संपादक सुनील ढेपे यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर लिहिला गेला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. पण खोट्याला पाय नसतात! बीडच्या पत्रकारांनी थेट आ. सुरेश धस यांची भेट घेऊन या पत्राविषयी विचारणा केली असता, त्यांनी या पत्राशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. सहीदेखील त्यांची नसल्याचे सांगत, सुनील ढेपे यांच्याशी कोणताही वाद नसल्याचे त्यांनी जाहीर केले.
षड्यंत्रकर्त्याचा पर्दाफाश!
धाराशिवमधील पत्रकारितेत एक “खोक्या” नेहमीच अशा कुरघोड्या करत असतो. त्याचे दुकान बंद झाल्याने तो हातपाय मारत आहे. हे त्याचेच कृत्य आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. लोकांना खोटे पत्र दाखवून बदनामी करण्याचा हा हास्यास्पद प्रयत्न होता. पण सत्य कधीच दडपता येत नाही. या कृत्यामागे असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आम्ही पोलिस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे. हे पत्र कोणी लिहिले? ते कोणी व्हायरल केले? आ. सुरेश धस यांची बनावट सही कोणी केली? याचा तपास करून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे.
सत्य अधिक उजळते!
हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही! धाराशिव लाइव्ह आणि संपादक सुनील ढेपे यांना वारंवार बदनाम करण्याचे प्रयत्न केले गेले. पण खरे सोने कितीही आगीत टाकले, तरी ते अधिक तेजस्वी होते! धाराशिव लाइव्ह हा लोकांचा आवाज आहे. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्याचे धैर्य आम्ही दाखवले, म्हणूनच काहींना हे पचले नाही.
खोक्याचे दुकान बंद आणि सत्याचा विजय!
धाराशिव लाइव्हच्या पत्रकारितेमुळे अनेकांचे खोटे मुखवटे फाटले. त्यामुळे “खोक्या” वारंवार असे खोटे कृत्य करतो. पण अशा बनावट पत्रांमुळे आमच्या धैर्याला धक्का बसत नाही. उलट आम्ही अधिक बळकट, अधिक प्रभावी होतो!
सत्य हे सूर्य आहे, ढगांनी झाकले तरी तो पुन्हा प्रकाशमान होतोच! धाराशिव लाइव्ह हे निर्भीड पत्रकारितेचे प्रतिक आहे आणि आम्ही कोणत्याही खोट्या प्रचाराला भीक घालत नाही. सत्यमेव जयते!
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह , मो. 7387994411