धाराशिव: नातवाविरुद्ध आलेला छेडछाडीचा अर्ज मिटवण्यासाठी आणि कायदेशीर कारवाई न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शिराढोण पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबलविरुद्ध अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. लाच स्वीकारताना संशय आल्याने या पोलीस कर्मचाऱ्याने पैसे घेण्याचे टाळले होते, मात्र एसीबीने पडताळणीत लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने त्याच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
अतुल संपत जाधव (वय ३४ वर्षे, पद- पोलीस कॉन्स्टेबल बकल नंबर १११६, नेमणूक- शिराढोण पोलीस ठाणे, रा. कोंबडवाडी, ता. जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या नातवाविरुद्ध शिराढोण पोलीस ठाण्यात छेडछाडीचा एक अर्ज आला होता. हा अर्ज निकाली काढण्यासाठी आणि नातवावर कारवाई न करण्यासाठी कॉन्स्टेबल अतुल जाधव याने ५,००० रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २१ मे २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली.
पडताळणीत लाचेची मागणी निष्पन्न; पण…
एसीबीच्या पथकाने २१ मे २०२६ रोजीच पंचांसमक्ष या तक्रारीची पडताळणी केली. यावेळी कॉन्स्टेबल जाधव याने छेडछाडीचा अर्ज मिटवण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि हे पैसे २३ मे रोजी घेऊन येण्यास सांगितल्याचे पंचांसमक्ष स्पष्ट झाले.
संशय आल्याने ‘ट्रॅप’ टळला!
ठरल्याप्रमाणे २३ मे २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने शिराढोण पोलीस ठाण्यात लाचेचा सापळा (Trap) रचला होता. मात्र, अत्यंत चाणाक्ष असलेल्या कॉन्स्टेबल जाधवला ऐनवेळी तक्रारदार आणि सोबत असलेल्या पंचांचा संशय आला. संशय आल्यामुळे त्याने पैसे स्वीकारण्यास साफ नकार दिला आणि तो निसटला.
अखेर आज गुन्हा दाखल!
आज, १८ जून २०२६ रोजी तक्रारदाराने पुन्हा एसीबी कार्यालयात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. आरोपीला संशय आल्यामुळे तो आता पैसे घेणार नाही, त्यामुळे पुढील कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी केली. त्यानुसार, लाचेची मागणी पडताळणीत आधीच सिद्ध झाली असल्याने, एसीबीचे पोलीस निरीक्षक विजय वगरे यांनी सरकारतर्फे शिराढोण पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल अतुल जाधवविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
घरझडती सुरू; लाचखोर कॉन्स्टेबल फरार!
गुन्हा दाखल होताच एसीबीच्या पथकाने आरोपी कॉन्स्टेबल अतुल जाधव याच्या घराची झडती (House Search) घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या आरोपी पोलीस कर्मचारी मिळून आला नसून, त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची तजवीज पोलीस करत आहेत.
या पथकाने केली कारवाई:
ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. शशिकांत सिंगारे, धाराशिवचे पोलीस उपअधीक्षक श्री. योगेश वेळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोनि विजय वगरे, तपास अधिकारी पोनि बाळासाहेब नरवटे, पोलीस अंमलदार तावस्कर आणि हजारे यांच्या पथकाने केली.
📢 एसीबीचे नागरिकांना आवाहन:
कोणत्याही शासकीय कामासाठी, अधिकारी किंवा कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असेल, तर खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा:
टोल फ्री क्रमांक: १०६४
व्हॉट्सॲप क्रमांक: ९२७०२३१०६४
संपर्क: पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव.






