धाराशिव – धाराशिव शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक असलेले पाणी उचलले जात नसल्याने सध्या ५ ते ६ दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे. या समस्येच्या पार्श्वभूमीवर, अमृत २ योजनेंतर्गत शहरासाठी नव्या पाणीपुरवठा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेतून २०४१ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून रुईभर आणि तेरणा धरणांतून नव्याने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे.
शहरास दररोज ५३.४६४ एमएलडी पाणी पुरवण्यासाठी एकूण २३०.३२ कोटी रुपयांच्या निधीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या निधीच्या वाटपात केंद्र शासन ३३.३३ टक्के (७६.८७ कोटी), महाराष्ट्र शासन ५१.६७ टक्के (११९ कोटी) आणि स्थानिक स्वराज्य संस्था १५ टक्के (३४.५५ कोटी) असा सहभाग असेल.
धाराशिव शहरास तेरणा, रुईभर, आणि उजनी धरणांतून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. १९७० साली तेरणा धरणातून ४.८० एमएलडी क्षमतेची योजना आणि १९८८ साली रुईभर धरणातून ५.८० एमएलडी क्षमतेची योजना आखण्यात आली होती. याशिवाय २०१३ साली उजनी धरणातून ८ एमएलडी क्षमतेची योजना करण्यात आली होती, जी २०२० साली अमृत योजनेत सुधारणा करून १६ एमएलडी क्षमतेपर्यंत वाढवण्यात आली.
मात्र, रुईभर धरणातून येणारी पाइपलाइन दुष्काळामुळे गंजून खराब झाल्याने ती योजना २०१९ पासून बंद आहे. तसेच तेरणा धरणातील पाइपलाइन व मोटारी वारंवार दुरुस्तीची गरज भासल्याने केवळ २ एमएलडी पाणीच उचलले जात आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येला ध्यानात घेता, १८ एमएलडी पाण्याचा पुरवठा अपुरा ठरत आहे, ज्यामुळे नागरिकांना दर ५-६ दिवसांनी पाणीपुरवठा करावा लागत आहे.
या समस्येवर तोडगा म्हणून अमृत २ योजनेंतर्गत २०४१ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून पाणीपुरवठ्याची योजना तयार करण्यात आली असून, मानवसेवा कन्सल्टंटद्वारे तयार करण्यात आलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे.