आज आपण ज्याला ‘माहितीचा युग’ म्हणतो त्या युगात, माहितीचा अधिकार हा कायदा आपल्याला आपले हक्क आणि अधिकारांची जाणीव करून देतो. या कायद्याचा वापर करून सामान्य माणूससुद्धा शासकीय यंत्रणेला जबाबदार धरू शकतो. आणि याच कायद्याचा अचूक वापर करून धाराशिवमध्ये पारदर्शकता आणण्याचे काम गेली अनेक वर्षे करत आहेत ते म्हणजे सत्यशोधक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार.
बाळासाहेब सुभेदार यांचा जीवनप्रवास हा संघर्ष आणि जिद्दीचा आहे. अत्यंत गरिबीतून वाटचाल करत त्यांनी सुरुवातीला न्यूज पेपर एजंट म्हणून काम केले. पेपरमधील बातम्या वाचून त्यांना पत्रकारितेची गोडी लागली आणि माहितीच्या अधिकाराचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले. ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांनी माहिती अधिकाराचा अभ्यास केला आणि त्याचे ते खरे ‘मास्टर’ बनले.
सुभेदार यांना शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात माहितीचा अर्ज कसा द्यावा, माहिती नाकारली गेल्यास पुढे अपील कसे करावे याची सखोल माहिती आहे. या ज्ञानाचा वापर करून त्यांनी अनेक मोठ्या प्रकरणांचा पर्दाफाश केला आहे. पोलीस विभाग असो वा महसूल विभाग, सुभेदार यांचा अर्ज आला की अधिकाऱ्यांना धडकी भरते. त्यांच्या धाडसी आणि अथक प्रयत्नांमुळे जवळपास १०० हून अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई झाली आहे. काहींवर तर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत.
सुभेदार यांचे शिक्षण केवळ बारावीपर्यंत आहे. ते एलएलबी नाहीत, पण कायद्याचे त्यांना सखोल ज्ञान आहे. ते सर्वसामान्य माणसाचे सर्वाधिकार पत्र घेऊन त्यांची बाजू मांडतात आणि कोणतीही तडजोड करत नाहीत. त्यामुळे अनेकांना न्याय मिळाला आहे. जिल्हाधिकारी यांचे बोगस नॉन-क्रिमिअर लेअर प्रकरण उघडकीस आणणे हे त्यांचे अलीकडचेच यश आहे.
सुभेदार हे केवळ माहिती अधिकार कार्यकर्ते नाहीत तर ते एक सामाजिक कार्यकर्तेही आहेत. त्यांच्या कार्यामुळे धाराशिवमधील अनेक सामाजिक प्रश्न उघडकीस आले आहेत आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला सक्रिय व्हावे लागले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत अनेक वृत्तपत्रे आणि माध्यमे त्यांच्या कामाचे कौतुक करत आहेत.
बाळासाहेब सुभेदार हे खऱ्या अर्थाने धाराशिवच्या पारदर्शकतेचे पहारेकरी आहेत. त्यांच्यासारख्या धाडसी आणि निःस्वार्थी कार्यकर्त्यांमुळेच आपल्या लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास अबाधित राहतो. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
– सुनील ढेपे