बीड – मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडे असताना, बीडच्या राजकीय आणि पोलीस वर्तुळात ‘चड्डीगेट’ वादाने खळबळ उडवली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी बीड पोलिसांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर केलेल्या एका ‘स्फोटक’ पोस्टमुळे खासदार बजरंग सोनवणे आणि पोलिसांमध्ये चांगलाच धुमाकूळ उडाला आहे.
‘चड्डी’वरून वादाची ठिणगी
गणेश मुंडे यांनी शनिवारी सायंकाळी बीड पोलीस प्रेस ग्रुपवर एक वादग्रस्त पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे बजरंग सोनवणे यांचा उल्लेख करत, “या खासदाराची चड्डी सुद्धा जागेवर राहणार नाही, मी जर प्रेस घेतली तर!” असे म्हणताच बीडच्या राजकीय वर्तुळात ‘चड्डी’वर चर्चा रंगली.
पोस्ट व्हायरल होण्याआधीच मुंडे यांनी ती डिलीट केली, पण चर्चा तिखट बनली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी तत्काळ कारवाई करत मुंडे यांना ग्रुपमधून ‘आऊट’ केले. मात्र, यामुळे ‘चड्डी’चा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
खासदारांचा पलटवार
बजरंग सोनवणे यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना, “मी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली की यांची चड्डी सैल झाली,” असे म्हणत विषयाला आणखी तिखट लावले. त्यांनी गणेश मुंडे आणि दहिफळे या दोघा सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली होती.
चड्डीगेटचे परिणाम
आता प्रश्न असा आहे की, गणेश मुंडे यांनी ‘चड्डी’चा उल्लेख नेमका कोणासाठी केला होता? लोकसभा सदस्यासाठी असे बोलणे पोलिस अधिकाऱ्यास शोभते का? विशेष म्हणजे, या वादामुळे बीड जिल्ह्याच्या राजकीय आणि पोलिस वर्तुळात ‘चड्डी पॉलिटिक्स’ चर्चेत आली आहे.
जिल्ह्यात ‘चड्डी पॉलिसी’चा विचार सुरू?
गणेश मुंडे यांच्या विधानानंतर बीडमध्ये पोलिसांसाठी नवा ड्रेस कोड लागू करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. “चड्ड्या व्यवस्थित ठेवणे अनिवार्य!” अशा प्रकारचे नवीन नियम लागू होण्याच्या चर्चा रंगत आहेत.
बीडमधील जनतेचे मत मात्र स्पष्ट आहे – “चड्डीच्या लढाईत सत्य बाहेर येऊ दे!”