धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस मात्र मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र आहे. गेल्या सहा महिन्यात एकही मोठी कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कर्नाटक राज्यातील हुमनाबाद, बसवकल्याण येथून गोवा, विमल, हिरा, आर. के. – एफ. के. – आरसीबी आदी कंपनीचा गुटखा उमरगा – लोहारा- बेंबळी – धाराशिव – येरमाळा, वाशी- भूम- आंबी- जामखेड मार्गे नगरला जात असून तेथून तो महाराष्ट्रात वितरित केला जात आहे.
ट्रक, आयशर, टेम्पो आदी वाहनांमधून हा गुटखा नेला जात असून, जामखेड येथील या गाड्या आहेत. करमाळा पोलीस स्टेशनचा पोलीस कॉन्स्टेबल गणेश नावाचा एक पोलीस कर्मचारी धाराशिव जिल्ह्यातील पोलीस स्टेशन ‘मॅनेज’ करीत असल्याची चर्चा आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे असले तरी ते केवळ नामधारी असून सर्व चार्ज गणेश कानगुडे यांच्याकडे आहे. कानगुडे यांना ‘लक्ष्मी दर्शन’ होत असल्याने कोणतीही ठोस कारवाई सध्या होत नसल्याचे बोलले जात आहे.
या तस्करीमुळे जिल्ह्यातील तरुणांचे आरोग्य धोक्यात येत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. गुटख्याच्या तस्करीतून मोठ्या प्रमाणात पैसा फिरत असल्याने यात काही पोलीस अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.