बीड : मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात न्यायालयीन लढाईसाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीची मागणी मस्साजोग गावातील ग्रामस्थ आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी केली होती.
विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, “मस्साजोगच्या ग्रामस्थांनी माझ्या नियुक्तीसाठी मागणी केली होती. त्यांनी या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलनही सुरू केले होते. ही बाब समजल्यावर मला व्यथित वाटले. त्यामुळे मी काल मुख्यमंत्री यांना याबाबत कळवले आणि हा खटला लढण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नियुक्तीचे आदेश दिले.”
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामस्थ आणि स्थानिक नेत्यांनी या प्रकरणात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी लावून धरली होती. आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीमुळे या खटल्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.