बेंबळी – पत्र्याच्या शेडच्या पत्रे काढण्याच्या वादातून दोघांनी एका व्यक्तीस मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना पाडोळी (ता. धाराशिव) येथे घडली. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी किरण मोतीलाल पवार (वय 41, रा. पाडोळी) यांना आरोपी ओम मधुकर पवार आणि मधुकर भगवान पवार (दोघे रा. पाडोळी) यांनी 25 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2 ते 2.30 वाजण्याच्या दरम्यान शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, त्यांना जीवघेण्या धमक्या देखील देण्यात आल्याचे समजते.
घटनेनंतर फिर्यादी यांनी 28 फेब्रुवारी रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 118(2), 115(2), 351(2)3), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.
प्रसादातून तब्येत बिघडल्याचा आरोप, वाद विकोपाला; महिला विरोधात गुन्हा दाखल
शिराढोण – देवाचा प्रसाद देऊन मुलाची तब्येत बिघडल्याचा आरोप करत झालेल्या वादातून शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी नागझरवाडी (ता. कळंब) येथील एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी प्रियंका भगिरथ माळी (वय 28, रा. नागझरवाडी) यांचा सात वर्षीय मुलगा उदय भगिरथ माळी यास 25 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता आरोपी सुनंदाबाई गणपती माळी (वय 55, रा. नागझरवाडी) यांनी देवाचा प्रसाद खाण्यास दिला. प्रसाद खाल्ल्यानंतर मुलास उलट्या सुरू झाल्या आणि त्याची तब्येत बिघडली.
यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या पतीने आरोपीस या घटनेबाबत विचारणा केली असता, आरोपीने शिवीगाळ केली आणि “तुझा वंश वाढू देणार नाही” अशी धमकी दिली. एवढेच नव्हे, तर डोळ्यात लाल मिरची पावडर फेकण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी प्रियंका माळी यांनी 28 फेब्रुवारी रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, आरोपी सुनंदाबाई माळी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 123, 352, 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिराढोण पोलीस करीत आहेत.