धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे तब्बल पाच वर्षांपूर्वी बांधून पूर्ण झालेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे अद्याप उद्घाटन झालेले नाही. २०१२ मध्ये या रुग्णालयास मंजुरी मिळाली होती आणि २०१९ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. मात्र, सरकारच्या अनास्थेमुळे ही इमारत वापरात येऊ शकलेली नाही.
पाच वर्षांपासून प्रतीक्षा… पण दरवाजे बंदच!
बेंबळी परिसरातील नागरिकांसाठी हे ग्रामीण रुग्णालय मोठ्या आशेचा किरण होते. मात्र, सुसज्ज इमारत असूनही रुग्णालय सुरू होत नसल्याने नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात म्हणून स्थानिकांनी वारंवार मागणी केली, पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
तानाजी सावंत यांचं दुर्लक्ष?
मागील अडीच वर्षांत धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे आरोग्य खात्याचा कार्यभार होता. त्यामुळे या रुग्णालयाच्या उद्घाटनाचा निर्णय त्यांच्या हातात होता. मात्र, अनेक वेळा स्थानिकांनी पाठपुरावा करूनही त्यांनी उद्घाटन केले नाही. आरोग्य खात्याचे मंत्री असूनही त्यांनी हे दुर्लक्ष का केले, याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.
आमदारही मौन धारण?
बेंबळी हा भाग तुळजापूर विधानसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना या विषयावर विचारले असता त्यांनी कोणताही ठोस प्रतिसाद दिलेला नाही. लोकप्रतिनिधींनीच दुर्लक्ष केल्याने या इमारतीचा उपयोग नागरिकांना कधी होणार, याचा प्रश्न उपस्थित होत आहे.
सरकारी अनास्थेमुळे जनतेचे हाल
रुग्णालय सुरू नसल्याने बेंबळी व आसपासच्या गावांतील नागरिकांना लहानशा आजारांसाठीही धाराशिव शहरात जावे लागते. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकदा रुग्णांचे हाल होतात. नवीन इमारत असूनही ती उपयोगात न आणणे म्हणजे सरकारी यंत्रणेची उदासीनता आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे.
सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा
बेंबळीतील ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. या इमारतीच्या उपयोगासाठी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते आंदोलनाचा इशारा देत आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या विषयाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर रुग्णालय सुरू करावे, अन्यथा लोक आक्रमक पवित्रा घेतील, अशी भावना व्यक्त होत आहे.