तुळजापूर : तुळजापुर शहरातील भारतीय स्टेट बॅकेच्या पाठीमागे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
ही घटना तुळजापुर पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर घडली. अंडे विक्रेते सलीम करीम सय्यद आणि त्यांच्या शेजारील चार घरांमध्ये अचानक आग लागली. या आगीमुळे दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यानंतर घरामध्ये असलेल्या इतर सिलेंडरचेही स्फोट झाले. या स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
मोठे नुकसान, मात्र जीवितहानी टळली
या घटनेवेळी संबंधित कुटुंबीय धार्मिक कार्यक्रमासाठी शहराबाहेर गेले होते, त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. या कुटुंबीयांनी “काळ आला होता पण वेळ आली नव्हती,” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, आगीत त्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संपत्ती जळून खाक
या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
- रहीम करीत सय्यद – ४ तोळे सोने व ३ लाख रुपये रोख जळून खाक.
- सलीम करीम सय्यद – घरबांधणीसाठी साठवलेले १४ लाख रुपये रोख आणि ७ तोळे सोने जळाले.
- अलीम करीम सय्यद – १.८२ लाख रुपये, ४ तोळे सोने व २० तोळे चांदी जळून खाक.
- संसारोपयोगी धान्य, वस्तू आणि साहित्याचेही नुकसान.
प्रशासनाची पाहणी व मदतीचे आश्वासन
घटनास्थळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांनी भेट देऊन पीडित कुटुंबीयांना संसारोपयोगी साहित्य आणि भांडी दिली. तसेच, संबंधित शासकीय विभागाकडून आवश्यक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, तहसीलदार अरविंद बोळंगे आणि स्थानिक नेत्यांनीही घटनास्थळी पाहणी केली.
शासकीय पंचनामा सुरू
ही घटना ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. घटनेनंतर मंडळाधिकारी अमर गांधले आणि गावकामगार तलाठी अशोक भातभागी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
या दुर्घटनेत जिवीतहानी टळली असली तरी, आर्थिक नुकसान मोठे आहे. पीडित कुटुंबीयांनी शासनाकडून मदतीची मागणी केली असून, प्रशासन कोणती मदत करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Video