धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूर झालेली एमआरआय स्कॅन मशीन कोल्हापूरला हलवल्याने जिल्ह्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे संतप्त नागरिक आणि विविध संघटनांनी निषेधाची भूमिका घेतली आहे.
अधिष्ठातांच्या चुकीच्या अहवालामुळे धाराशिववर अन्याय?
धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मॅडमने आरोग्य विभागाला पाठवलेल्या अहवालात रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्याचे नमूद केले होते. परंतु, प्रत्यक्षात एमआरआय स्कॅनसाठी फार कमी जागेची गरज असते. त्यामुळे चुकीचा अहवाल दिल्यामुळे धाराशिवच्या नागरिकांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
डीन स्वतः एमडी रेडिओलॉजी तज्ञ असताना चुकीचा अहवाल का?
धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन मॅडम स्वतः एमडी रेडिओलॉजी तज्ञ आहेत. त्यांना एमआरआय मशीनसाठी आवश्यक असलेल्या जागेची योग्य माहिती आहे. तरीही, त्यांनी आरोग्य विभागाला जागा उपलब्ध नसल्याचा अहवाल का दिला? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. एमआरआय मशीनसाठी फारच कमी जागेची गरज असते, हे त्यांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे त्यांचा अहवाल चुकीचा असल्याचा आरोप होत आहे.
खासगी डॉक्टरांच्या फायद्यासाठी सरकारी मशीनला ब्रेक?
धाराशिव शहरात दोन खासगी डॉक्टरांकडे एमआरआय स्कॅन मशीन उपलब्ध आहेत. त्यांच्याकडून कमिशन मिळत असल्याने अधिष्ठातांनी जाणीवपूर्वक चुकीचे पत्र पाठवले, असा आरोप नागरिक करत आहेत. सरकारी सुविधांचा गैरफायदा घेऊन रुग्णांना खासगी दवाखान्यांकडे वळवण्याचा हा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे.
धाराशिव लाईव्हची धडक बातमी, आमदार कैलास पाटलांची तातडीची कारवाई
‘धाराशिव लाईव्ह’ने या प्रकरणाची बातमी सर्वप्रथम प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. यानंतर आमदार कैलास पाटील यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून एमआरआय व सीटी स्कॅन मशीन हलविण्याचा निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
रुग्णांचे हाल, प्रशासनावर कारवाईची मागणी
धाराशिव जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशीन असते, तर गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असता. मात्र, खासगी दवाखान्यांना फायदा मिळावा म्हणून प्रशासनाने जाणूनबुजून हा निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
धाराशिवकरांचा रोष पाहता आता आरोग्य विभाग आणि प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.