धाराशिव: जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची दयनीय परिस्थिती असताना, येथील एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीन दुसऱ्या जिल्ह्यात हलविण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना पत्र लिहून त्यांनी हा निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकारने धाराशिव जिल्हा रुग्णालयातील एमआरआय मशीन इचलकरंजी येथे आणि तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन लोणावळा येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार पाटील यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.
आरोग्य सुविधांचा अभाव आणि शासनाचा दुर्लक्ष
जिल्ह्यातील नागरिकांना आधीच उपचारांसाठी सोलापूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून उपलब्ध असलेल्या सुविधाच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “हे कुणाच्या सुपीक डोक्यातून सुचले?” असा संतप्त सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे.
गरीब रुग्णांचे हाल होणार
सामान्य नागरिक खाजगी रुग्णालयांमधील महागड्या सेवा परवडत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याऐवजी त्या कमी करण्याचा हा निर्णय अत्यंत अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. आधीच धाराशिव जिल्हा कायम दुष्काळग्रस्त असल्याने शासनाकडून सापत्न वागणूक मिळते, त्यात आता आरोग्य सुविधाच काढून घेण्याचा निर्णय घेतला जात आहे.
हा प्रकार सहन करण्याच्या पलीकडे गेला असून, एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीन हलविण्याचा निर्णय तत्काळ रद्द करून त्या सुविधा पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.