धाराशिव – जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अपुरी असल्याने नागरिकांमध्ये नाराजी असून, मंजूर झालेल्या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे इतरत्र हलवण्यात येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
धाराशिव जिल्हा रुग्णालयात एम.आर.आय. स्कॅनिंग सेवा मंजूर असूनही, जागेअभावी हे मशीन इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथे हलवण्यात आले आहे. तसेच, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजूर झालेले सिटी स्कॅन मशीन जागेअभावी लोणावळा येथे हलवण्यात आले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
एम.आर.आय. आणि सिटी स्कॅनसारख्या महत्त्वाच्या सुविधा जिल्ह्याच्या बाहेर हलवणे म्हणजे येथील रुग्णांची मोठी आर्थिक आणि मानसिक पिळवणूक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. खासगी एम.आर.आय. केंद्रांना आर्थिक फटका बसू नये म्हणून जिल्हा रुग्णालयातील ही सुविधा सुरू केली जात नाही, असा आरोपही करण्यात येत आहे. खासगी एम.आर.आय. केंद्रचालक आणि जिल्हा शासकीय आणि वैद्यकीय अधिकारी यांचे साटेलोटे असून, त्यांच्याकडून लाच मिळत असल्यानेच एम.आर.आय. स्कॅनिंग मशीन इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथे हलवण्यात आले आहे.
यामुळे धाराशिव आणि तुळजापूर येथील नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, त्यांनी प्रशासनाने त्वरित योग्य पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष घालून जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.