भूम – शेतातील वीजपुरवठा खंडित असल्याच्या कारणावरून महावितरणच्या कार्यालयात घुसून कनिष्ठ अभियंत्याला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना पाथरूड येथे घडली आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका शेतकऱ्याविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पाथरूड येथील महावितरण शाखा कार्यालयात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेले आदित्य बालाजी व्हटकर (वय २३, रा. समर्थनगर, भूम) हे १९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास कार्यालयात शासकीय कामकाज करत होते.
त्यावेळी पाटसांगवी (ता. भूम) येथील रहिवासी काकासाहेब केरबा इंदलकर हा कार्यालयात आला. “आज चार दिवस झाले शेतातील लाईट बंद आहे, तुमचा लाईन स्टाफ फोन उचलत नाही,” असा जाब विचारत त्याने कनिष्ठ अभियंता आदित्य व्हटकर यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच अंगावर धावून जात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
भूम पोलिसांत गुन्हा नोंद
या मारहाणीप्रकरणी कनिष्ठ अभियंता आदित्य व्हटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १९ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपी काकासाहेब इंदलकर याच्याविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भूम पोलीस करत आहेत.




