भूम -तालुक्यातील राळेसांगवी गावात एका घरात मध्यरात्री धाडसी चोरीची घटना घडली आहे. तोंडाला मास्क लावलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सुमारे 5 लाख 1 हजार 900 रुपयांचा ऐवज लुटून नेला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजी गोरख टाळके यांच्या घरी दिनांक 04.03.2025 रोजी रात्री 2:15 ते 4:00 च्या दरम्यान ही घटना घडली. चार अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी टाळके आणि साक्षीदार शोभा तनपुरे यांना मारण्याची धमकी देऊन घरातील सोन्याचे दागिने आणि 1 लाख 70 हजार रुपये रोख रक्कम चोरली. चोरट्यांनी धान्याच्या कोठीतील धान्य सुद्धा चोरून नेले.
शिवाजी टाळके यांच्या तक्रारीवरून भुम पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम 331(3), 309(4), 305 अन्वये अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
तुळजापूर बसस्थानकात धाडसी चोरी; महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपयांचे दागिने लंपास
तुळजापूर बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना सुरेश पवार (वय 50, रा. पानगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) या 4 मार्च 2025 रोजी सकाळी 9:10 च्या सुमारास तुळजापूर बसस्थानकातून बार्शीला जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 9 ग्रॅम वजनाचे, अंदाजे 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
रंजना पवार यांच्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.