धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ऐन दिवाळीत एक यशस्वी सापळा कारवाई करून, जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील शिपाई सागर अशोक क्षीरसागर याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणात तक्रारदाराने आपल्या पुतण्याच्या जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दाखल केलेल्या प्रस्तावासाठी शासकीय प्रक्रियेनुसार मंजुरी मिळवण्यासाठी तक्रारदाराकडून लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने त्यांच्या पुतण्याच्या जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळविण्याचा अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, धाराशिव येथे दाखल केला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी समितीतील शिपाई सागर अशोक क्षीरसागर याने तक्रारदाराकडे 20,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती. लाचेची रक्कम तडजोड करून 19,000 रुपये देण्याचे मान्य करण्यात आले.
धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ठरलेल्या वेळेनुसार तक्रारदाराला दिलेल्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही केली. ठरलेल्या 19,000 रुपयांची लाच रक्कम स्वतः स्वीकारताना सागर क्षीरसागर याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर संबंधित अधिकार्यांनी त्यास ताब्यात घेतले व अधिकृत कागदपत्रांची तपासणी केली. या प्रकरणात आरोपीविरुद्ध आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या यशस्वी सापळा कारवाईचे नेतृत्व धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. त्यांना मार्गदर्शन छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. मुकुंद आघाव यांनी दिले.कारवाईच्या वेळी सापळा पथकात अमलदार दिनकर उगलमुगले, नेताजी अनपट, गणेश जाधव, सचिन शेवाळे आणि चालक दत्तात्रय करडे हे सदस्य सहभागी होते.
नागरिकांसाठी आवाहन:
धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने, अथवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने शासकीय काम करून देण्यासाठी लाच मागितल्यास तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. लाचलुचपत विभागाच्या धाराशिव कार्यालयाशी 02472-222879 या दूरध्वनी क्रमांकावर तसेच 1064 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.