परंडा येथील नुरोद्दीन मोहम्मद युनुस यांना सीएनजी गॅस पंप परवान्यासाठी पात्र असल्याचे खोटे सांगून अंकिता शर्मा नावाच्या व्यक्तीने तब्बल 4,82,500 रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नुरोद्दीन यांना अंकिता शर्मा हिने स्वतःला महानगर गॅस एजन्सीची कर्मचारी असल्याचे सांगून गॅस पंप एरिया लॉकिंग आणि परवान्याच्या कामासाठी पैसे मागितले. विश्वास ठेवून नुरोद्दीन यांनी वेळोवेळी एकूण 4,82,500 रुपये आरटीजीएसद्वारे अंकिता शर्माच्या बँक खात्यात जमा केले. मात्र, त्यानंतरही त्यांना सीएनजी गॅस पंप मिळाला नाही, तेव्हा त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
या घटनेनंतर नुरोद्दीन यांनी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(ड) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.