धाराशिव : सोलापूर-धुळे महामार्गावर गुरुवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत १६ लाख ८५ हजार रुपयांचे गोमांस जप्त केले. या प्रकरणी समीर महेमुद कुरेशी (वय ३२, रा. खिरणी मळा, धाराशिव) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरेशी हा टाटा एलपीटी (एमएच ४२ बीएफ १०३३) मधून आठ लाख रुपये किमतीचे सुमारे चार टन गोमांस घेऊन जात होता. रात्री साडेअकराच्या सुमारास प्रथमेश हॉटेलजवळ पोलिसांच्या पथकाने त्याला थांबवून गाडीची तपासणी केली. त्यावेळी गाडीत गोमांस असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी कुरेशीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५ (अ), ५ (ब), ५ (क) आणि ९ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेल्या गोमांसाची आणि गाडीची एकूण किंमत १६ लाख ८५ हजार रुपये आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
भूम येथे जनावरांची निर्दयतेने वाहतूक, आरोपी ताब्यात
भूम : भुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनावरांची निर्दयतेने वाहतूक करताना एक टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी टेम्पो चालक आफजल बशीर शेख (वय 41, रा. माळवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख हा आयशर टेम्पो (क्रमांक एमएच 13 एएक्स 3640) मध्ये चार जर्सी गायी घेऊन जात होता. गायींना टेम्पोमध्ये पुरेशी जागा नव्हती, तसेच त्यांच्या चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. यामुळे जनावरांची निर्दयतेने वाहतूक होत असल्याचे पोलिसांना आढळून आले.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आफजल शेख याच्याविरुद्ध प्राण्यास क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11 (ड)(ई)(ई)(ए)(ठ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी टेम्पोसह गायी ताब्यात घेतल्या असून त्यांची किंमत 7 लाख 10 हजार रुपये इतकी आहे.
या घटनेमुळे जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. जनावरांना पुरेशी जागा, चारा आणि पाण्याची व्यवस्था करणे कायद्याने बंधनकारक आहे.