धाराशिव : वाघ पकडण्याच्या मोहिमेत वन विभागाने आजवर अनेक युक्त्या लढवल्या, पण जंगलाच्या राजासमोर सर्वच फोल ठरल्या. नव्या रेस्क्यू टीमने पहाटे चारच्या सुमारास येडशी अभयारण्यात वाघाला पकडण्यासाठी डार्ट गनचा प्रयत्न केला, पण वाघाने पुन्हा चकवा दिला! आता सलग दुसऱ्यांदा डार्ट गनचा नेम चुकल्याने वन विभागाचा नाकर्तेपणा समोर येत आहे.
डार्ट गन – चालकाचा नेम की वाघाचा चकवा?
- वाघाला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट गनचा अचूक वापर करणे गरजेचे असते.
- पहाटेच्या वेळी जंगल शांत असताना संधी साधत रेस्क्यू टीमने वाघावर निशाणा साधला.
- मात्र, नेहमीप्रमाणेच हा वाघ अचूक वेगाने हालचाल करत डार्ट चुकवण्यात यशस्वी ठरला.
- परिणामी, सलग दुसऱ्यांदा वन विभागाच्या प्रयत्नांवर पाणी फिरले, आणि वाघ पुन्हा मोकाट फिरत राहिला!
५५ जनावरांचा बळी – वाघ पकडायचं की मोकाट सोडायचं?
सध्या वाघाने तब्बल ५५ पाळीव जनावरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. “वन विभागाने वाघ पकडण्याऐवजी त्याच्या शिकारीसाठी पैसे गोळा करायला सुरुवात केली की काय?” असा सवाल आता ग्रामस्थ विचारू लागले आहेत.
वन विभागाचा ‘नवीन प्लॅन’ – दोन टीम तयार!
वन विभागाच्या विशेष टीमला महिना झाला तरी अजूनही यश आलेले नाही. त्यामुळे उद्यापासून दोन स्वतंत्र टीम बनवून नवी मोहीम सुरू केली जाणार आहे.
- एक टीम वाघाच्या नेहमीच्या हालचालींवर लक्ष ठेवणार.
- दुसरी टीम त्याला डार्ट मारण्यासाठी योग्य संधी साधणार.
शेवटी वाघ मोठा की वन विभाग कमजोर?
येडशी अभयारण्यात सुरू असलेल्या या नाट्यमय संघर्षाने वन विभागाची यंत्रणा अडचणीत आली आहे. वाघ दिवसेंदिवस हुशार होत आहे की वन विभाग निष्क्रिय होत आहे? हा सवाल ग्रामस्थांना भेडसावत आहे.
आता नवीन टीमने ठोस कृती केली नाही, तर हा वाघ ‘रेस्क्यू टीमच्या’ ऐवजी ‘फ्लॉप शो टीमचा’ धडाच इतिहासात घालून जाईल!