धाराशिव: धाराशिव व तुळजापूर तहसील कार्यालयात एन.ए. ले-आउट व गौण खनिज उत्खननात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्या आहेत. या प्रकरणी कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तक्रारदार अमोल जाधव यांनी केला आहे.
जाधव यांच्या म्हणण्यानुसार, धाराशिव व तुळजापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये एन.ए. ले-आउट करताना संबंधित विभागाच्या परवानग्या न घेताच ग्रीन झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच, गौण खनिज उत्खनन करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची १ हजार ब्रासची परवानगी असताना, तहसीलदारांनी नियमबाह्यपणे ५०० ब्रास गौण खनिज उत्खनन करून ते उचलण्याची परवानगी दिली आहे.
या प्रकरणाची चौकशी उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी सुरू केली असता, तहसीलदार व कर्मचाऱ्यांनी फाईल्स दडवून ठेवल्या आहेत. तसेच, डव्हळे यांच्यावरच आरोप करून त्यांच्या विरोधात काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
तुळजापूरचा ले-आउट, धाराशिवची कागदपत्रे!
तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील पवनजीतकौर गिरवरसिंग सुखमनी यांनी सर्वे गट नं. १७६ मधील १२ हजार स्क्वेअर फुट जागेचा एन.ए. ले-आउट करण्याचा अर्ज तुळजापूर तहसील कार्यालयास दिला होता. मात्र, त्याची परवानगी देताना धाराशिव तहसील कार्यालयाच्या अधिकृत लेटर पॅडवर परवानगी देण्यात आली आहे.
अनेक प्रश्न अनुत्तरित
एन.ए. ले-आउट करताना बांधकाम विभाग, आरोग्य विभाग यासह इतर ८ विभागांच्या परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, धाराशिव तहसीलदारांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची परवानगी न घेताच एन.ए. ले-आउटला परवानगी कशी दिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, १० टक्के ॲम्युनिटीस स्पेस बिल्डरांच्या घशात कसा गेला, याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
काम बंद आंदोलनावर प्रश्नचिन्ह
या प्रकरणाच्या फाईल्स तपासण्यासाठी उपविभागीय अधिकारी डव्हळे व त्यांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली असता, त्या फाईल्स धाराशिव तहसीलच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दडवून ठेवल्या आहेत. याबाबत २६ डिसेंबर रोजी समितीचे गठण करण्यात आले होते. मात्र, ३१ डिसेंबर रोजी दुपारी अचानक काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले. यामागे काय कारण आहे, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाचे हात बरबटले
एन.ए. ले-आउट व गौण खनिज उत्खननात झालेल्या अनियमिततेमुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाला आहे. या भ्रष्टाचारात महसूल प्रशासनाचे हात बरबटले असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.