धाराशिव – जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जामगाव येथील 10 वा वर्ग नापास असलेल्या 31 वर्षीय ज्ञानेश्वर उद्धव मोरे या युवकाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेतून शेळीपालन व्यवसायातून स्वावलंबनाचा मार्ग शोधला आहे.
ज्ञानेश्वर मोरे याने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेतून 6 लाख रुपये कर्ज घेतले.मिळालेल्या कर्जातून ज्ञानेश्वरने शेळीपालन व्यवसायाला सुरुवात केली.शेळीपालनाच्या व्यवसायातून ज्ञानेश्वरला महिन्याकाठी 15 हजार रुपये उत्तम मिळत आहेत.
ज्ञानेश्वर मोरेने पूर्वी सन 2007 -16 दरम्यान कृष्णा खोरे महामंडळ संभाजीनगर येथे सुरुवातीला 8 हजार ते 17 हजार रुपये मानधनापर्यंत 9 वर्ष काम केले.त्यानंतर सन 2016 – 2020 या दरम्यान बांधकाम मजुर म्हणून काम केले.तेव्हा त्याला 12 हजार रुपये मानधन मिळत असे. त्यानंतर ज्ञानेश्वरने निर्णय घेतला की आपल्या घरी असलेल्या 5 एकर शेतीतच स्वत: काम करून एखादा शेतीपूरक व्यवसाय केला तर आपल्याला कोणाकडे मजूर म्हणून कामासाठी जाण्याची आवश्यकताच पडणार नाही.शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन करण्याचे ज्ञानेश्वरने ठरविले. त्यासाठी 2021 ला त्याने शासनातर्फे शेळीपालनची माहिती घेवून त्याबाबतचे प्रशिक्षण घेतले.
ज्ञानेश्वरने शेळीपालनाच्या व्यवसायाची सुरुवात सन 2022 ला 10 शेळ्या घेवून केली.त्याला साधारण 1 लाख 10 हजार रुपये हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खर्च आला.
पण सुरवातीला शेळीपालनातील अपुऱ्या माहितीमुळे व शेळीला विविध प्रकारचे आजार असतात हे माहित नसल्याने सुरुवातीला 50 हजार नुकसान झाले.पूर्वी ज्ञानेश्वरचे वडील असताना घरी शेळी हा शेतीला जोड व्यवसाय होताच.तोच आपणही आपल्याच जागेत करण्याचे त्याने ठरविले.शेळीपालन प्रशिक्षणादरम्यान अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेबद्दल माहित मिळाली होती.
शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कर्जासाठी ज्ञानेश्वरने भारतीय स्टेट बँकेच्या परंडा शाखेशी संपर्क केला असता त्यांनी 6 महिने टाळाटाळ केली.त्यानंतर प्रियदर्शनी सहकारी बँक येथे संपर्क केला असता बँक कर्ज देण्यास तयार झाली.बँकेने शेळीपालनासाठी 6 लाख रुपये 12 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले.या कर्जातून ज्ञानेश्वरने 16 शेळ्या 2 लाख 72 हजार रुपयातून खरेदी केल्या. शेळ्यासाठी 2 लक्ष 50 हजार रुपये खर्च करून शेड उभारले.शेळ्या आणण्यासाठी आणि शेडचे साहित्य आणण्यासाठी 50 हजार रुपये वाहतूकीसाठी खर्च केला.सुरवातीला 16 शेळ्या होत्या.आज ज्ञानेश्वरकडे सध्या 42 शेळ्या आहेत. शेळीपालन व्यवसायातून त्याला दर महिन्याला
15 हजार रुपये शिल्लक
बँकांनी समाजातील तरुणांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी सहकार्य केले तर जास्तीत जास्त तरुणांनी शेळीपालनाच्या व्यवसायाकडे वळावे. त्यासाठी लागणारे भांडवल म्हणून बिन व्याजी कर्ज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेतून उपलब्ध होण्यास मदत होईल.हे महामंडळ ज्ञानेश्वरला वेळेवर व्याज परतावा करत आहे.कारण ज्ञानेश्वर हा बँकेला नियमित कर्जाचा हप्ता भरत आहे.कधीकाळी दुसरीकडे मजुरीचे काम करणाऱ्या ज्ञानेश्वरला अण्णासाहेब पाटिल महामंडळ स्वावलंबनासाठी आधारवड ठरले आहे.