धाराशिव: धाराशिवच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील बेजबाबदार कारभाराने आता हद्दच पार केली आहे. आता बालरुग्ण विभागात डॉक्टरच गैरहजर असतात, त्यामुळे रोज लहानग्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांच्या या छळाकडे डीन गंगासागरे कधी लक्ष देणार? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. परिस्थिती अशीच राहिली, तर “आँखें तो खोलो स्वामी!” म्हणण्याची वेळ आली आहे.
बालरुग्ण विभागात डॉक्टरांचा पत्ता नाही, मुलांचा छळ सुरू!
महाविद्यालयातील बालरुग्ण विभागात उपचार घेण्यासाठी आलेल्या लहानग्यांची अक्षरशः फरफट सुरू आहे. डॉक्टर वेळेवर उपलब्ध नाहीत, कर्मचाऱ्यांचा अभाव आहे, आणि पालकांना त्यांच्या मुलांच्या उपचारांसाठी ताटकळत बसावे लागते. काही वेळा तर मुलांना औषधांशिवायच परत पाठवले जात असल्याचे प्रकार घडत आहेत.
गंगासागरे लक्ष देणार की निव्वळ ‘गंगास्नान’ करणार?
डीन गंगासागरे यांना महाविद्यालय आणि हॉस्पिटलची स्थिती सुधारण्याची इच्छाच नाही का? त्यांच्या कार्यकाळात इथली अवस्था इतकी बिकट झाली आहे की रुग्णांना योग्य उपचार मिळणेही कठीण झाले आहे. बालरुग्ण विभागातील डॉक्टरांचे सततचे गैरहजेरीने पालक संतप्त झाले आहेत, मात्र व्यवस्थापनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही.
वनौषधी विभागात ‘संपत्ती’ची राख – झाडं तोडून जाळण्याचा प्रताप!
वनौषधी विभागात औषधी झाडांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले गेले असते, तर त्यातून कंपोस्ट खत तयार करता आले असते. मात्र, येथे मात्र जबाबदार अधिकाऱ्यांनी नुसते काम केल्याचा देखावा करण्यासाठी वनौषधींच्या झाडांच्या फांद्या तोडून त्या सर्रास जाळल्या आहेत!
संपत्तीचे व्यवस्थापन नाही, फक्त विनाश!
ही वनस्पतींनी समृद्ध असलेली संपत्ती योग्यरीत्या जपली गेली असती, तर महाविद्यालयाला आणि संशोधनाला मोठी मदत झाली असती. मात्र, काम न करण्याच्या सवयीने ग्रासलेल्या व्यवस्थापनाने झाडांचे संवर्धन न करता त्यांची राखरांगोळी करणेच पसंत केले!
डीन साहेब, आता तरी जागे व्हाल का?
महाविद्यालयात डॉक्टरांचा अभाव, बालरुग्णांचा छळ, वनौषधींची नासाडी आणि शिपायांचा सुळसुळाट – हे सगळं डीन गंगासागरे यांच्या काळात घडतंय. तरीही ते गप्प का? आता तरी “आँखें तो खोलो स्वामी!” म्हणण्याची वेळ आली आहे.
धाराशिवच्या जनतेला आणि विद्यार्थ्यांना उत्तर मिळणार की हे संस्थान अशाच निष्क्रियतेच्या गर्तेत ढकललं जाणार?