धाराशिव: मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील हजारो रुग्णांसाठी आधार असलेले धाराशिव शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे रुग्णालय आता निधीअभावी कोलमडले आहे. येथे एक्सरे, सोनोग्राफीसह अनेक महत्त्वाच्या सेवांचा बोजवारा उडाला असून, औषधांची टंचाई आणि तांत्रिक अडचणींमुळे रुग्णांची फरफट सुरू आहे.
📌 एक्सरे रिपोर्ट ‘मोबाईल’वर, फिल्म नाही!
रुग्णालयात एक्सरे फिल्म उपलब्ध नसल्यामुळे टेक्निशियन मोबाईलनेच फोटो काढून डॉक्टरांच्या मोबाईलवर पाठवतात. यामुळे या रेकॉर्डचे कोणतेही दस्तऐवजीकरण होत नाही. विशेषतः ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन नाही, त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
📌 सोनोग्राफी आठवड्यातून फक्त दोन दिवस!
सोनोग्राफी सेवा आठवड्यात फक्त मंगळवारी आणि शुक्रवारीच चालते. येथे नियमित रेडिओलॉजिस्ट नसल्याने, बाहेरून रेडिओलॉजिस्ट आणले जातात. मात्र, ते फक्त तासभर सेवा देऊन निघून जातात. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना मोठा मनःस्ताप आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
📌 केस पेपर काढण्यास विलंब – सॉफ्टवेअर प्रशिक्षण नाही!
रुग्णांची नोंदणी करण्यासाठी १ जानेवारीपासून नवीन सॉफ्टवेअर लागू करण्यात आले, मात्र कर्मचाऱ्यांना त्याचे कोणतेही प्रशिक्षण दिलेले नाही. त्यामुळे केस पेपर तयार करताना मोठा वेळ लागत असून, रुग्णांना नोंदणी कक्षासमोर ताटकळत उभे राहावे लागत आहे.
📌 औषधांचा तुटवडा – रुग्णांना खाजगी खरेदीचा फर्मान!
रुग्णालयात त्वचारोग, स्त्रीरोग, वेदनाशमनासाठी लागणारी औषधे, तसेच विविध प्रकारची सिद्ध तूप औषधे उपलब्ध नाहीत. यामुळे डॉक्टर रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्याचे आदेश देतात. परिणामी रुग्णांवर अनावश्यक आर्थिक भार टाकला जात आहे.
📌 डॉक्टर राउंडवर, त्यामुळे बाह्य रुग्ण तपासणी कोलमडली!
रुग्णालयात सकाळच्या वेळेस बाह्यरुग्ण तपासणीसाठी तीन नियमित डॉक्टर उपलब्ध असतात. मात्र, त्याच वेळी ते ‘राउंड’वर निघून जातात. परिणामी, विद्यार्थी डॉक्टरांकडून रुग्ण तपासले जातात, त्यामुळे अनेक वेळा योग्य निदान न होता रुग्णांची गैरसोय होते.
🔍 थेट प्रश्न – थेट उत्तरे!
👉 प्रश्न: एक्सरे फिल्म का नाहीत?
✅ उत्तर: “होय, येथे फिल्म उपलब्ध नाहीत, त्यामुळे आम्ही फोटो मोबाईलवरच पाठवतो.”
👉 प्रश्न: सोनोग्राफी फक्त दोन दिवसच का?
✅ उत्तर: “येथे सोनोग्राफीसाठी रेडिओलॉजिस्टचे पद मंजूर नाही. काही डॉक्टर सामाजिक जबाबदारी म्हणून फक्त दोन दिवस सेवा देतात.”
👉 प्रश्न: औषधे उपलब्ध का नाहीत?
✅ उत्तर: “निधीअभावी औषधे उपलब्ध नाहीत, त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागतात.”
➡️ निधीअभावी रुग्णालयाचा बोजवारा, प्रशासन झोपेत!
धाराशिव आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालयाचा लौकिक अर्ध्या महाराष्ट्रात पसरलेला आहे. मात्र, निधीअभावी येथील आरोग्यसेवा पूर्णतः ठप्प होत आहे. सरकारकडून पुरेशा निधीची तरतूद केली जात नाही आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत.
👉 सरकार आणि आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा हे महाविद्यालय आणि रुग्णालय केवळ नावापुरते उरेल!