धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुचर्चित ‘लाच प्राध्यापिका’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्हाभर चर्चेचा विषय ठरलेल्या या प्राध्यापिकेने आता विविध संघटनांना एकत्र करून नवं निवेदन तयार करण्याचा घाट घातलाय. पण प्रश्न असा आहे, या निवेदनावर सही कोण करणार? कारण आधीच्याच निवेदनावर सही केलेल्यांना आता सुभेदारांच्या चिमट्यातून सुटायला वेळ लागतोय!
निवेदन बनवण्याचा खेळ: हुशारी का हुजरेगिरी?
निवासी उपजिल्हाधिकारी या खुर्चीला आजवर अनेक चांगल्या चारित्र्याच्या व्यक्तींचा आधार मिळाला होता, पण या खुर्चीवर “लाच प्राध्यापिके”ची वर्णी लागल्यापासून जिल्ह्यात गोंधळाचे नवीन अध्याय सुरु झालेत. कोतवाल, पोलीस पाटील, तलाठी, तहसीलदार आणि अगदी कर्मचारी संघटना सुद्धा या प्रकरणात ओढल्या गेल्यात.
“सही करा, नाही तर…”
पहिल्या निवेदनाच्या वेळी बोगस नॉन-क्रीमीलेअर प्रकरण झाकण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना गोळा करून निवेदनावर सही घेतली होती. मात्र यावेळी, सगळ्यांनाच माहित आहे की या प्राध्यापिकेने पुन्हा निवेदन तयार करून जबरदस्ती सही घेतली, तर पुढचा नंबर तिच्या ‘चमच्यांचा’ असणार आहे. त्यामुळे, आता सही करावी की नाही, यावर जिल्हाधिकारी कार्यालयात दबक्या आवाजात चर्चा रंगली आहे.
हुजरेगिरीची स्पर्धा
आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील वातावरण आणखी रंगतदार होणार आहे. आरडीसी म्हणजेच निवासी उपजिल्हाधिकारी यांची मर्जी संपादन करण्यासाठी, “मी आरडीसीचा खास माणूस आहे,” हे दाखवण्यासाठी, कर्मचारी आणि अधिकारी हुजरेगिरी करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे, इतर तालुक्यांतील प्रतिनियुक्तीच्या स्वप्नांनी पछाडलेले अधिकारीसुद्धा या संधीचा फायदा घेण्यासाठी रांगेत उभे आहेत.
काळ्या दगडावरची पांढरी रेष
“लाच प्राध्यापिके”साठी निवेदन तयार करणाऱ्याचा आणि जबरदस्ती सही घेणाऱ्याचा पुढचा नंबर काय असेल, हे वेळच ठरवेल. पण जिल्हाधिकारी कार्यालयातला हा निवेदन-ड्रामा पाहण्यासाठी धाराशिवकर उत्सुक आहेत.
जिल्हा कार्यालयातला हा नवा अध्याय धाराशिवच्या इतिहासात “लाच प्राध्यापिकेची हुकूमशाही” म्हणून ओळखला जाईल, यात शंका नाही!