धाराशिव – धाराशिव येथील हॉटेल पुष्पक पार्क येथे 5 ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी राज ठाकरे यांच्या ‘महाराष्ट्रात आरक्षण देण्याची गरज नाही’ या वक्तव्याचा निषेध करत त्यांना हॉटेलमधून बाहेर पडण्यापासून रोखले होते. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धैर्यशील सस्ते, निखिल जगताप, निलेश सांळुके, बलराज रणदिवे, अभिजीत सुर्यवंशी, अक्षय नाईकवाडी, अमित जाधव, हणमंत यादव, बापू देशमुख, सौरभ गायकवाड आणि तेजस बोबडे यांच्यासह 12 जणांविरुद्ध भादंवि कलम 189(2), 323, 126(2) आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे धाराशिव शहरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.