धाराशिव – नगरपालिकेचे निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्यावर धाराशिवमध्ये एकूण सात गुन्हे दाखल आहेत. पैकी चार गुन्हे दखलपात्र आहेत. पाचव्या गुन्ह्यात १० दिवस पोलीस कस्टडी आणि १४ दिवस जेल भोगल्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली होती, पण सहाव्या गुन्ह्यात पुन्हा अटक झाली , सहाव्या गुन्ह्यात जामीन झाला असला तरी २७ कोटीच्या सातव्या गुन्ह्यात त्यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सध्या ते धाराशिव कारागृहात बंधिस्त आहेत.येलगट्टे यांच्यावर आणखी एक म्हणजे आठवा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. गुंठेवारी प्रकरणात येलगट्टे दोषी आढळले आहेत. शहरातील १३४ बेकायदा गुंठेवारी प्लॉटिंगला लेआऊट मंजूर केल्या प्रकरणी हा ठपका ठेवण्यात आला आहे.
हरीकल्याण येलगट्टे धाराशिवमध्ये कार्यरत असताना, त्यांनी अनेक गैरव्यवहार केले. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला.अनियमित बांधकाम परवाना देणे, बेकायदा गुंठेवारी प्लॉटिंगला लेआऊट मंजूर करणे,भंगार विकणे, नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणे, कंत्राटदारांना कामाचे बोगस चेक देणे, विविध बँकेत अनेक खाते उघडणे आदी प्रकरणात ते अडकले आहेत. त्यांच्या काळातील अनेक फाईल्स सध्या गायब आहेत. हरीकल्याण येलगट्टे यांच्याबरोबर पालिकेचे दहा कर्मचारी अडकले असून, तेही निलंबित आहेत. धाराशिव पालिकेतील कथित भ्रष्ट्राचार धाराशिव लाइव्हने चव्हाट्यावर आणला आहे.
शहरातील १३४ बड्या लोकांना बेकायदा गुंठेवारी प्लॉटिंगला लेआऊट मंजूर करून निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांनी लाखो रुपयाची माया जमावली आहे. पुण्यात चार फ्लॅट, फलटण, कोकणात करोडो रुपयाची जमीन खरेदी केल्याची माहिती आहे. पुण्यात एका मेडिकल दुकानदाराकडून येलगट्टे यांनी ५० लाख रुपये हातउसने घेऊन चुना लावल्याचे समजते.
खरे सूत्रधार बाहेर
धाराशिव नगर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून हरीकल्याण यलगट्टे कार्यरत असताना, ते पालिकेचा कारभार हाकणाऱ्या एका नेत्याच्या हातचे बाहुले झाले होते. त्या नेत्याचा एक नातेवाईक पालिकेत नगर अभियंता पदावर कार्यरत होता, त्याने यलगट्टे यांच्या सह्या घेऊन लाखो रुपयाचा अपहार केला. या राजकीय नेत्याने अनेक बोगस बिले काढून येलगट्टे यांना गोत्यात आणले आहे.