धाराशिव – धाराशिव शहरातील शासकीय आयुर्वेदिक कॉलेज ते तेरणा कॉलेज पर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर आज बुलडोझर फिरवण्यात आला. नगर पालिका आणि सावर्जनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या या मोहिमेत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली अनधिकृत बांधकामे, दुकाने जमीनदोस्त करण्यात आले.
या मोहिमेदरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन ट्रॅक्टर आणि दोन जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली. धाराशिव शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली होती. यामध्ये मोरे हॉस्पिटल आणि के. के. हॉस्पिटलचा काही भागही अतिक्रमण असल्याचे आढळून आले. त्यामुळे या हॉस्पिटलच्या काही भागांवरही कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित असलेले उपकार्यकारी अभियंता पी.डी.मोरे यांनी सांगितले की, “अनधिकृत अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. रस्त्यांचे रुंदीकरण करून वाहतूक सुलभ करण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा सुरूच राहतील.”
या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि रस्ते रुंदीकरणाचे कामही सुरळीत होईल, असा विश्वास नगर पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.