तुळजापूर – “जनतेसाठी” हे घोषवाक्य घेऊन सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून तलाठी कार्यालयांच्या इमारती बांधल्या, पण प्रत्यक्षात या इमारतींचे उपयोग ‘जनतेसाठी’ कमी आणि ‘वराहांसाठी’ जास्त होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे! तुळजापूर शहरातील एका नव्याकोऱ्या तलाठी कार्यालयात ‘वराह पालन’ सुरू असल्याचे वृत्त सामाजिक प्रश्नांची जाण असणारे अमोल जाधव यांनी उघड केले आहे.
इमारत तलाठ्यांसाठी की वराहांसाठी?
महसूल विभागाने तलाठ्यांना सुसज्ज कार्यालय मिळावे म्हणून मोठा निधी खर्च करून सुंदर इमारती बांधल्या. पण सरकारला एवढा आनंद झाला की, त्या इमारती तलाठ्यांच्या हवाली करायलाच विसरले! त्यामुळे तलाठ्यांनीही परिस्थितीचा फायदा घेत दुसरीकडे भाड्याने जागा घेतली आणि या इमारती हवामान निरीक्षणासाठी किंवा ‘वराह पालनासाठी’ उपयुक्त असल्याची शासकीय मोहर लागली.
वराहांचे ‘शासकीय वारसाहक्क’
तुळजापूर शहरातील नव्याने उभारलेल्या तलाठी कार्यालयात सध्या वराहांची वसाहत तयार झाली असून, त्यांनी या शासकीय जागेचा “गावरान” कब्जा घेतला आहे. अद्ययावत कार्यालयात गादीऐवजी गवताचे गोधडी अंथरले गेले असून, माहिती फलकाच्या ठिकाणी आता वराहशास्त्राचे नवे नियम झळकत आहेत.
तलाठ्यांचे ‘व्यवसायभान’!
दुसरीकडे तलाठ्यांनी महसूल विभागाचा कारभार ओळखून ‘स्मार्ट’ निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वतःच एका खासगी इमारतीत भाड्याने जागा घेऊन, तिथेच “भाडेतत्त्वावर तलाठी कार्यालय” सुरू केले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी तलाठ्याला शोधायला जंगलात न जाता थेट बाजारात जावे, अशी सोय करण्यात आली आहे.
जनतेचा प्रश्न – “ही इमारत खरंच तलाठ्यांसाठी होती का?”
गावकऱ्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. तलाठ्यांचे कार्यालय कोठे आहे? सरकारी इमारतीत की दुकानात? हे कळत नसल्याने लोकांचा गोंधळ उडाला आहे. महसूल विभाग यावर सडेतोड उत्तर देईल का, की “वराहसंवर्धन योजनेंतर्गत” या इमारतींचा उपयोग केला जात असल्याचे सांगेल, हे पाहणे रंजक ठरेल!
“कोट्यवधींचा खर्च धुळखात की गवतखात?”
सरकारने लाखो रुपये खर्च करून तलाठी कार्यालय उभारली, पण तलाठ्यांच्या उपस्थितीऐवजी वराहांचा वावर अधिक असल्याने हा पैसा शेवटी धुळखात गेला की गवतखात, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महसूल प्रशासनाने लवकरच निर्णय घ्यावा, अन्यथा पुढच्या टप्प्यात या इमारतींवर अन्य चौपायांचा ताबा बसेल, असा गावकऱ्यांचा इशारा आहे!
Video