तुळजापूर: तुळजापूर शहराजवळील घाटात एक खाजगी बस पलटी झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात रेखा गणपत ओव्हाळ (वय 55, रा. मोशी, पुणे) या महिलेचा मृत्यू झाला, तर 40 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना 29 जानेवारी 2025 रोजी सकाळी 5.30 वाजता घडली. मोशी येथून 40 प्रवाशांना घेऊन बस (एमएच 12 पी.क्यु 0668) तुळजापूरकडे जात होती. तुळजापूर शहराजवळ चालकाने बस निष्काळजीपणे चालवल्याने ती उलटली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या अपघातात रेखा ओव्हाळ या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. इतर 40 प्रवाशांनाही गंभीर दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत करण्यात आली.
सनी साहेबराव शिंदे (वय 27, रा. डुडूळगाव, आळंदी देवाची) यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात या अपघाताची फिर्याद दाखल केली आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला, असा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी चालक ज्ञानेश्वर बारसकर (रा. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Video