धाराशिव – महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करत जिल्ह्यासाठी २५ नवीन बस उपलब्ध करून दिल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) धाराशिव जिल्ह्यासाठी २५ नवीन अशोक लेलँड कंपनीच्या बीएस-६ बसगाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या आधुनिक सोयीसुविधांनी युक्त बसगाड्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, हैदराबाद, संभाजीनगर, धुळे, नाशिक या ठिकाणी धावणार आहेत.धाराशिव आगारासाठी १०, तुळजापूर आगारासाठी १० आणि कळंब आगारासाठी ५ बसगाड्या देण्यात आल्या आहेत.
धाराशिव ते मुंबई, धाराशिव-बोरिवली, धाराशिव-हैदराबाद, धाराशिव-पुणे, धाराशिव-कोल्हापूर, तुळजापूर-संभाजीनगर, तुळजापूर-सोलापूर-पुणे, तुळजापूर-धुळे, तुळजापूर-नाशिक, कळंब-बोरिवली, कळंब-बार्शी-पुणे, कळंब-छत्रपती संभाजीनगर अशा विविध मार्गांवर या बसगाड्या धावणार आहेत.
या बसगाड्या सुरक्षित, आरामदायी आणि इंधन कार्यक्षम असून प्रवाशांना चांगली वाहतूक सेवा मिळणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील अनेक जुन्या बसगाड्या बंद पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. या नवीन बसगाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार असून वाहतूक सेवा अधिक सक्षम होणार आहे.जिल्ह्याला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून नव्या बसगाड्या मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
२५ जानेवारी रोजी पत्रकारांशी संवाद साधताना, पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्ह्यासाठी ५० बस देण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २५ बस वाटप करण्यात आल्या आहेत. धाराशिव आगाराला १०, तुळजापूर आगाराला १० आणि कळंब आगाराला ५ अशा एकूण २५ बस आता प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.
आश्वासन पाळणारा नेता म्हणून प्रतिमा निर्माण
राजकारणात अनेकदा मोठी आश्वासने दिली जातात, मात्र ती पूर्ण न झाल्याने नागरिकांचा विश्वास कमी होतो. मात्र, पालकमंत्री सरनाईक यांनी केवळ चार दिवसांतच आपले वचन पाळून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये तफावत नसल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाबाबत नागरिकांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील प्रवाशांना एस.टी.च्या माध्यमातून अधिक चांगल्या सेवा मिळाव्यात, यासाठी पुढील काळातही मंत्री सरनाईक विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्पही लवकर गती घेतील, अशी आशा नागरिकांना वाटत आहे.