धाराशिव: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे धाराशिवचे कलेक्टर डॉ. सचिन ओम्बासे यांच्याविरुद्ध एक गंभीर तक्रार करण्यात आली आहे. ओम्बासे यांनी बनावट नॉन-क्रिमी लेअर प्रमाणपत्र सादर करून UPSC परीक्षा दिली आणि IAS अधिकारी बनले., असा आरोप करण्यात आला आहे.
या तक्रारीची दखल घेण्यात आली असून, भारत सरकारचे अवर सचिव रूपेश कुमार यांनी चौकशीसाठी नवी दिल्लीतील उच्चपदस्थ अधिकारी संजय कुमार चौरसिया यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे डॉ. सचिन ओम्बासे हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
ओम्बासे यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि त्यांचे वडील रयत शिक्षण संस्थेच्या एका वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांच्या पत्नीचे मामा हे IAS अधिकारी आहेत आणि त्यांचे चुलत भाऊ हे डॉक्टर आहेत, त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असल्याने त्यांना नॉन-क्रिमी लेअर प्रमाणपत्र मिळण्यास पात्रता नव्हती.ओम्बासे यांनी यापूर्वी चार वेळा UPSC परीक्षा दिली होती, परंतु त्यांना अपयश आले होते. पाचव्यांदा त्यांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून OBC प्रवर्गातून परीक्षा दिली आणि IAS अधिकारी बनले, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
ही तक्रार लोकसेवा आयोगाकडे पाठ्वण्यात आली होती, ही तक्रार त्यांनी भारत सरकारच्या केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाकडे पाठवली होती ,या मंत्रालयाने तक्रारीची दखल घेतली असून पुढील कारवाई सुरू केली आहे.
काय आहे तक्रार ?
डॉ. सचिन छगनलाल ओम्बासे, कलेक्टर, धाराशिव हे सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मजबूत कुटुंबातून आले आहेत. त्यांच्या आईचे भाऊ (त्यांचे मामा) सदामु पंढरीनाथ खाडे हे २००६ च्या बॅचचे मध्य प्रदेश कॅडरचे IAS अधिकारी आहेत. ते त्यावेळी टीकमगड (भोपाल) चे कलेक्टर होते. त्यांचे सावत्र भाऊ MD डॉक्टर होते. वडील रयत शिक्षण संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांचे काका पोलीस अधिकारी होते. आई सुशिक्षित होती.सचिन छगनलाल ओम्बासे हे स्वतः IRS पदावर कार्यरत होते आणि IPS निवडले गेले होते. इतके मजबूत आर्थिक पाठबळ असूनही, फक्त IAS होण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणून बेकायदेशीरपणे NCL प्रमाणपत्र मिळवले आणि गरीब OBC च्या जागेवर IAS झाले.
१. डॉ. सचिन छगनलाल ओम्बासे यांनी २००९ मध्ये UPSC ची परीक्षा पहिल्यांदा सामान्य वर्गातून दिली आणि त्यात ते नापास झाले.
२. त्यानंतर त्यांनी २०१० मध्ये पुन्हा सामान्य वर्गातून परीक्षा दिली आणि त्यांचा २२८ वा क्रमांक आला. त्यांना IRS (IT) सेवा मिळाली.
३. २०११ मध्ये त्यांनी पुन्हा सामान्य वर्गातून परीक्षा दिली आणि त्यांचा ४१० वा क्रमांक आला. त्यामुळे त्यांना IAS सेवा मिळाली नाही.
४. २०१३ मध्ये त्यांनी पुन्हा सामान्य वर्गातून परीक्षा दिली आणि त्यांचा २१५ वा क्रमांक आला.त्यांना IPS (महाराष्ट्र केडर) सेवा मिळाली.
५. सामान्य वर्गातून त्यांचे सर्व ४ प्रयत्न संपले.परंतु IAS होण्याच्या हव्यासापोटी त्यांनी UPSC आणि देशाची फसवणूक करून २०१४ मध्ये OBC वर्गातून परीक्षा दिली. त्यांचा १६४ वा क्रमांक आला आणि OBC प्रवर्गामुळे त्यांना IAS (महाराष्ट्र केडर) सेवा मिळाली.
प्रश्न असा आहे की,
४ वेळा सामान्य वर्गातून परीक्षा देणारे डॉ. ओम्बासे हे अचानक OBC कसे झाले? २०१० मध्ये त्यांचा २२८ वा क्रमांक आला होता आणि त्यांना IRS सेवा मिळाली होती. त्याच वर्षी २३३ वा क्रमांक असलेल्या OBC उमेदवाराला IAS सेवा मिळाली होती. जर डॉ. ओम्बासे हे खरोखरच OBC असते तर त्यांना २०१० मध्येच IAS सेवा मिळाली असती. त्यांना ४ वेळा परीक्षा देण्याची गरजच पडली नसती.यावरून हे सिद्ध होते की त्यांनी बेकायदेशीरपणे बनावट NCL प्रमाणपत्र मिळवले आणि IAS झाले.
डॉ. ओम्बासे यांचे वडील छगनलाल हे दहिवडी वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक होते. २०११, २०१२, २०१३ मध्येही ते प्राध्यापक होते. त्यांचा मासिक पगार जवळपास १ लाख रुपये होता. म्हणजेच त्यांचे वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपये होते. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने २५ मार्च २०१३ रोजी एक परिपत्रक काढले होते. त्यानुसार, VJ, NT, OBC उमेदवारांच्या पालकांचे मागील ३ वर्षांचे वार्षिक उत्पन्न ४.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना NCL प्रमाणपत्र मिळणार नाही. या नियमानुसार, डॉ. ओम्बासे यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपये असल्याने त्यांना NCL प्रमाणपत्र मिळू शकत नव्हते.
UPSC CSE २०१४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०१४ होती. याचा अर्थ, अर्ज करण्यापूर्वीच्या ३ आर्थिक वर्षांमधील वार्षिक उत्पन्न ४.५ लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवे होते. म्हणजेच १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीतील उत्पन्न विचारात घेतले जाणार होते. यावरून हे स्पष्ट होते की, २०१४ मध्ये पाचव्या प्रयत्नासाठी डॉ. ओम्बासे यांनी बेकायदेशीरपणे NCL प्रमाणपत्र मिळवले आणि IAS झाले.
डॉ. ओम्बासे हे २००९, २०१०, २०११, २०१३ मध्ये सामान्य वर्गातून परीक्षा देत होते. मग अचानक २०१४ मध्ये त्यांना OBC चे NCL प्रमाणपत्र कसे मिळाले? जर ते खरोखरच OBC असते तर त्यांना २०१० मध्येच IAS सेवा मिळाली असती. त्यांना ४ वेळा परीक्षा देण्याची गरजच पडली नसती. यावरून हे सिद्ध होते की डॉ. ओम्बासे यांनी IAS होण्यासाठी, IPS झाल्यानंतरही, UPSC आणि देशाची फसवणूक केली आहे. त्यांनी वडिलांचे १२ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असतानाही NCL प्रमाणपत्र मिळवले आहे. त्यामुळे खऱ्या गरीब OBC उमेदवारांना संधी गमवावी लागली आहे.