धाराशिव: मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि रोजंदारी कामगारांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारची कर्जवसुली तात्काळ स्थगित करावी, अशी जोरदार मागणी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात यंदा तीव्र स्वरूपाचा कोरडा दुष्काळ पडला आहे. गेल्या दीड महिन्याहून अधिक काळापासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके धोक्यात आली असून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य कामगार गंभीर आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे नसल्याने स्थानिक अर्थव्यवस्था ही पूर्णपणे शेती आणि शेतीपूरक रोजगारावरच अवलंबून आहे.
अशा बिकट परिस्थितीतही सरकारी, खासगी व सहकारी बँकांसह नॉन-बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) आणि विविध मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून दुचाकी, चारचाकी, पीक कर्ज, बचत गट कर्ज व सोने तारण कर्जांच्या हप्त्यांसाठी तगादा लावला जात आहे. या सक्तीच्या वसुलीमुळे आधीच संकटात सापडलेल्या नागरिकांवर प्रचंड आर्थिक व मानसिक ताण निर्माण होत आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन सर्व वित्तीय संस्था व बँकांना कर्जवसुली तात्काळ थांबवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच जिल्हा अग्रणी बँकेमार्फत (Lead Bank) जिल्ह्यातील सर्व बँकांना दुष्काळ काळात सहकार्याची भूमिका घेण्याचे आणि सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देण्याचे निर्देश द्यावेत, अशी आग्रही विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.





