धाराशिवच्या प्रशासकीय रंगमंचावर मोठ्या नाट्यमय घडामोडी सुरू आहेत! डॉ. सचिन ओंबासे या वादग्रस्त अधिकाऱ्याची अखेर सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून बदली झाली, पण त्यांच्या जागी कोणी जिल्हाधिकारी म्हणून येणार? हा मोठा प्रश्न आहे.
प्रशासनातील चांगली वाईट दोन्ही तत्त्वं अनुभवलेल्या धाराशिवकरांच्या अपेक्षा आता “कडक शिस्तीचे आणि भ्रष्टाचाराला पायबंद घालणारे अधिकारी हवेत!” असा जोर धरू लागला आहे. आणि अशाच अधिकाऱ्यांच्या यादीत एक नाव पुन्हा चर्चेत आलंय – तुकाराम मुंढे!
का हवेत धाराशिवकरांना तुकाराम मुंढे?
तुकाराम मुंढे म्हणजे प्रशासनाचा वाघ! त्यांच्या बद्दल सांगायचं झालं तर –
✔ जिथे जातात, तिथलं सिस्टिम चांगल्या अर्थाने हादरवतात
✔ भ्रष्टाचार्यांना एक सेकंदही शांत झोपू देत नाहीत
✔ सरळ रेषेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हिरो!
यापूर्वी ते नागपूर, जालना, सोलापूर आणि नाशिकसारख्या ठिकाणी प्रशासनाचा चेहरामोहरा बदलणारे अधिकारी म्हणून ओळखले गेले आहेत. म्हणूनच धाराशिवमध्ये महसूल विभागात सुरू असलेले घोटाळे आणि प्रशासकीय गलथानपणा पाहून जनतेला वाटतंय, “मुंढेसाहेब आले तर खेळ खल्लास!”
धाराशिव जिल्ह्यातील भ्रष्टाचाराचे थैमान
डॉ. ओंबासे यांच्या काळात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले.
🔴 बोगस नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र प्रकरण – जिल्हाधिकारीच बोगस दस्तऐवजाच्या आधारावर पदावर होते, हीच मोठी शोकांतिका!
🔴 महसूल विभागात भ्रष्टाचाराचा सुळसुळाट – जमीन घोटाळे, लिलाव प्रक्रियेत अपारदर्शकता, ठराविक बिल्डर आणि लॉबीला मदतीचा आरोप.
🔴 पवनचक्की प्रकरण – काही खास लोकांसाठी प्रशासनाने नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप.
🔴 फटाका स्फोट प्रकरण – तेरखेडा दुर्घटनेवर हिवाळ्यात गवताला आग लागून स्फोट झाला, असला हास्यास्पद अहवाल देण्यात आला.
ही सगळी पार्श्वभूमी बघता, धाराशिव जिल्ह्याला आता ‘कडक’ जिल्हाधिकारी लागणार, नाही तर पुन्हा भ्रष्टाचाराची ‘साखळी’ सुरू होणार!
मुंढे येतील का? की फक्त चर्चा?
प्रशासनात बदल हवा हे निश्चित. पण तुकाराम मुंढे येणार का, की ही फक्त चर्चेपुरती अपेक्षा आहे? हा खरा प्रश्न. सरकार कोणती नेमणूक करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जर धाराशिवला एक कर्तव्यदक्ष, भ्रष्टाचारविरोधी जिल्हाधिकारी मिळाला, तर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलू शकतो.