धाराशिव: जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्यांमध्ये सहा चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये घरफोडी, मोबाईल चोरी, शेती साहित्याची चोरी, दुचाकी चोरी आणि शेळ्या चोरीच्या घटनांचा समावेश आहे. धाराशिव शहर, ग्रामीण, आनंदनगर, तुळजापूर, बेंबळी आणि परंडा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हे गुन्हे घडले आहेत.
मकर संक्रांतीला गावी गेल्यानंतर फोडले घर
सदाशिव त्रिंबक जाधव (रा. पोस्ट कॉलनी, धाराशिव) हे आपल्या पत्नीसह मकर संक्रांतीच्या सणानिमित्त गावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी १३ ते १४ जानेवारी दरम्यान त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. घरातून कपाटातील २५ ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने आणि १५ हजार रुपये रोख असा एकूण ६१,१०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तुळजापुरात भाविकाचा महागडा मोबाईल चोरीला
तुळजापूर दर्शनासाठी आलेले राहुल चंद्रकांत नाटेकर (रा. दापोली, जि. रत्नागिरी) यांचा ५२,९९९ रुपये किमतीचा ‘वन प्लस १५ आर’ कंपनीचा मोबाईल मंदिराच्या पार्किंगमधून चोरट्याने लांबवला. ही घटना १० जानेवारी रोजी घडली.
वाघोली शिवारात शेतकऱ्यांचे नुकसान
वाघोली शिवारातील सतीश सखाराम मगर, राजेंद्र मगर आणि दत्ता मगर या शेतकऱ्यांच्या शेतातील स्प्रिंकलरचे नोझल आणि विद्युत मोटार असा ३५,००० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला. ७ ते ८ जानेवारी दरम्यान ही चोरी झाली.
घरासमोरून दुचाकी लंपास
नितळी येथील धनंजय चंद्रकांत महानुभव यांची १५,००० रुपये किमतीची बजाज प्लॅтина दुचाकी (MH 24 BT 2161) त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली. ही घटना १२ जानेवारी रोजी सकाळी घडली.
शेळ्या चोरणारा जेरबंद
भांडगाव (ता. परंडा) येथील महादेव चांगदेव अंधारे यांच्या गोठ्यातून दोन शेळ्या (किंमत २०,००० रुपये) चोरून नेत असताना महेश कालीदास कोथिंबीरे (रा. बार्शी, जि. सोलापूर) हा दुचाकीवर (MH 13 BS 6887) मिळून आला. त्याच्याविरुद्ध परंडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुकानाच्या काउंटरवरून चोरी, महिलांवर गुन्हा
देशपांडे स्टँड येथील विनायक मसाले दुकानाच्या काउंटरवरून ५ हजार रुपये रोख आणि मोबाईल असा २०,००० रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी आनंदीबाई सोनवणे आणि पूजा नितीन कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सिंधू देवानंद कांबळे यांनी ही तक्रार दिली आहे.
सर्व संबंधित पोलीस ठाण्यांत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.







