परंडा तालुक्यातील भोत्रा येथे सीना नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या जेसीबी चालकाने महसूल विभागाच्या पथकातील सदस्याला धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणला. ही घटना २४ जानेवारी रोजी सायंकाळी घडली.
फिर्यादी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) मेनका मोतिराम राठोड (वय ३०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भोत्रा येथील सीना नदीपात्रात जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा सुरू होता. आरोपी जेसीबी चालक अजय सतीश मेहर (रा. परंडा) याने अंदाजे ३५ हजार रुपये किमतीची ५ ब्रास वाळू चोरून नेली. कारवाईसाठी गेलेल्या पथकातील सदस्य नागेश बबन मसुडगे यांना त्याने धक्काबुक्की केली आणि जेसीबी घेऊन पळून गेला. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) आणि १३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव ग्रामीण: वालगुड शिवारातून ७७ हजारांच्या कृषी पंपांची चोरी
शेतकऱ्यांच्या शेती साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारला असून, वालगुड शिवारातील लघु प्रकल्प तळ्यामधून तब्बल ४ पाणबुडी मोटारी चोरीला गेल्या आहेत.
फिर्यादी रामा भारत गायकवाड (रा. जुनोनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३ जानेवारी, १२ जानेवारी आणि २४ ते २५ जानेवारी या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी पाण्यात सोडलेल्या मोटारी चोरून नेल्या. यामध्ये ५ एच.पी.च्या २ मोटारी, ॲन्सन कंपनीची ७.५ एच.पी. मोटार, लाडा कंपनीची ७.५ एच.पी. मोटार आणि सी.आर.आय. कंपनीची ७.५ एच.पी. मोटार व केबल असा एकूण ७७,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी: सरमकुंडी येथून घरासमोर लावलेली दुचाकी लंपास
वाशी तालुक्यातील सरमकुंडी (गणेशपट्टी वस्ती) येथे घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. ही घटना २० जानेवारीच्या रात्री घडली.
फिर्यादी शेषेराव एकनाथ गायकवाड (वय ४९) यांची हिरो स्पलेंडर प्लस (एमएच २५ ए.ई. ५३१२) ही दुचाकी त्यांनी रात्री घरासमोर लावली होती. सकाळी पाहिले असता ती जागेवर मिळून आली नाही. या २५ हजार रुपये किमतीच्या दुचाकी चोरीप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात २५ जानेवारी रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




