धाराशिव – जिल्हा शासकीय रुग्णालयातील लेखापाल निलेश ठाकरे आणि गुरुनाथ घाडगे यांची मुजोरी वाढली आहे , एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यास १० हजार रुपये लाच दिली नाही म्हणून या दोघांनी बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक आय. के . मुल्ला कोणती कारवाई करणार ? याकडे लक्ष वेधले आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी भास्कर निवृत्ती पवार यांचे वार्षिक वेतनवाढ, एरियस तसेच मागील ऑक्टोबर महिन्याचा पगार काढण्यासाठी लेखापाल निलेश ठाकरे आणि गुरुनाथ घाडगे यांनी दहा हजर लाचेची मागणी केली. पैकी पाच हजार लाच भास्कर पवार यांनी दिली पण उर्वरित पाच हजार न दिल्यामुळे दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता लेखापाल निलेश ठाकरे आणि गुरुनाथ घाडगे यांनी चतुर्थश्रेणी कर्मचारी भास्कर पवार यास रुग्णालयातच बेदम मारहाण केली.
त्याची लेखी तक्रार चतुर्थश्रेणी कर्मचारी भास्कर पवार यांनी रुग्णालय प्रशासनाकडे केली असता, त्याची अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी लाकाळ यांनी चौकशी करून प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक आय. के . मुल्ला यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. त्यात लेखापाल निलेश ठाकरे आणि गुरुनाथ घाडगे यांच्यावर गंभीर स्वरुपाचा ठपका ठेवण्यात आला आहे. लेखापाल निलेश ठाकरे आणि गुरुनाथ घाडगे यांनी अनेक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याना ७ व्या वेतन आयोगाचा फरक, घर बांधणी अग्रीम तसेच इतर शासकीय बिले काढण्यासाठी पैश्याची मागणी करत असल्याचे नमूद केले आहे.
लेखापाल निलेश ठाकरे आणि गुरुनाथ घाडगे हे मागील पाच महिन्यापासून विना परवाना गैरहजर राहणे, गैरहजेरीत वरिष्ठ कर्मचाऱ्यासोबत वाद घालून त्यांना मारहाण करणे, हुज्जत घालणे असे प्रकार करत आहेत. या दोघांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९७९ अंतर्गत शिस्तभंगाची कार्यवाही करून निलंबित करावे, अशी शिफारस अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी लाकाळ यांनी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक आय. के . मुल्ला यांच्याकडे पाठवलेल्या अहवालात केली आहे. त्यामुळे मुल्ला हे लेखापाल निलेश ठाकरे आणि गुरुनाथ घाडगे यांच्यावर कोणती कारवाई करणार ? याकडे लक्ष वेधले आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यातच आरोग्य कर्मचाऱ्यांनी लाचखोरीचा कळस गाठला आहे.
मारहाणीची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
जिल्हा शासकीय रुग्णालयातील लेखापाल निलेश ठाकरे आणि गुरुनाथ घाडगे यांनी १० हजार लाच दिली नाही म्हणून आपणास दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता बेदम मारहाण केल्याची तक्रार चतुर्थश्रेणी कर्मचारी भास्कर निवृत्ती पवार यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. याप्रकरणी पोलीस काय कारवाई करणार ? याकडं लक्ष वेधले आहे.
दरम्यान, लेखापाल निलेश ठाकरे आणि गुरुनाथ घाडगे कडक कारवाई न केल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने दिला आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्याचा आशीर्वाद
जिल्हा शासकीय रुग्णालयातील लाचखोर आणि मुजोर लेखापाल निलेश ठाकरे आणि गुरुनाथ घाडगे यांच्यावर प्रशासकीय अधिकाऱ्याचा आशीर्वाद आहे, त्यांच्या सांगण्यावरूनच हे दोघे लाच गोळा करत असल्याचे समजते, हे प्रशासकीय अधिकारी एका राजकीय पक्षाच्या नेत्याचा नातेवाईक आहे. त्यामुळे आमचे कुणी वाकडे करू शकत नाही, असा अहंकार त्यांना चढला आहे.
प्रकरण एसीबीकडे सोपवा
जिल्हा शासकीय रुग्णालयातील लेखापाल निलेश ठाकरे आणि गुरुनाथ घाडगे यांनी अनेक कर्मचाऱ्यांची अडवणूक करून लाच घेतली आहे.लाच घेऊन या दोघांनी लाखो रुपयाची माया जमवली आहे. त्याची चौकशी करण्यासाठी हे प्रकरण लाच लुचपत प्रतिबंधक पोलीस विभागाकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.