धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीचा कालावधी संपला असून, केवळ २१ टक्केच पाहणी झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
१ डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत शेतकऱ्यांनी स्वतः ई-पीक पाहणी करायची होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे बहुतांश शेतकरी पाहणी करू शकले नाहीत. डीजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल ॲपमध्ये बिघाड असल्याने ऑनलाइन नोंदणी होऊ शकली नाही.
आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून १०० टक्के ई-पिक पाहणी करण्याची मागणी केली आहे. ई-पिक पाहणी नसल्यास शेतकऱ्यांना अनुदान, पिक विमा आणि नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई मिळणार नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
जिल्ह्यात एकूण ५ लाख ८५ हजार ८६९ पैकी केवळ ६९ हजार ९०५ शेतकऱ्यांनीच ई-पिक पाहणी केली आहे. उमरगा, कळंब, तुळजापुर, धाराशिव, परंडा, भूम, लोहारा आणि वाशी या तालुक्यांमध्ये पाहणीचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
प्रशासनाने आता स्वतःच्या स्तरावरून ई-पिक पाहणी करण्याची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे, अशी मागणी जोर धरत आहे.