तुळजापूर: तुळजापूर तहसील कार्यालयातून निर्गत झाल्याचे भासवणारे बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवनजीतकौर गिरवरसिंग सुखमणी (वय ५४, रा. औरंगाबाद) आणि सतिश सोपानराव येरणाळे (वय ५८, रा. पुणे) यांनी ९ डिसेंबर २०२४ रोजी बनावट कागदपत्रांचा वापर करून तुळजापूर तहसील कार्यालय आणि शासनाची फसवणूक केली.
याप्रकरणी तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी १६ जानेवारी २०२५ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३१८(४), ३३८, ३३६(४), ३४०(२), ३४१(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकार?
गेल्या डिसेंबर महिन्यात दुय्यम निबंधक कार्यालय, तुळजापूर येथे दस्त क्रमांक 6037/2024 नोंदवला गेला होता. हा दस्त तयार करताना तहसील कार्यालयाने दिलेल्या आदेशाचा दाखला देण्यात आला होता. मात्र, संबंधित कागदपत्रे तपासल्यानंतर ती बनावट असल्याचे स्पष्ट झाले. तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी याबाबत तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
गुन्हा नोंद
तहसील कार्यालयाच्या अहवालावरून, दस्त तयार करताना अकृषिक आदेशासाठी बनावट कागदपत्रे जोडली गेली. या प्रकरणी लिहून देणारे पवनजीतकौर गिरवरसिंग सुखमणी (रा. औरंगाबाद) आणि दस्त घेणारे सतिश सोपानराव येरणाळे (रा. पुणे) यांच्या विरोधात तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून या व्यवहारात आणखी काहीजण सामील असल्याची शक्यता आहे.
मास्टरमाईंड लिपिकाचा हात?
या प्रकरणाचा मास्टरमाईंड तहसील कार्यालयाचा एक लिपिक असल्याचा संशय आहे. धाराशिव आणि तुळजापूर तहसील कार्यालयांमध्ये या लिपिकाने यापूर्वीही असे अनेक काळे कारनामे केल्याचे समोर आले आहे. या लिपिकाच्या कारनाम्यांचा पर्दाफाश “धाराशिव लाईव्ह”ने केला आहे.
सावधानतेचे आवाहन
तहसील कार्यालयाने नागरिकांना शेती व जमिनीचे व्यवहार करताना कागदपत्रे योग्यरीत्या पडताळूनच व्यवहार करण्याचे आवाहन तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी केले आहे. योग्य पडताळणी न झाल्यास फसवणुकीची शक्यता अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
तक्रार दाखल होऊनही पोलिसांनी तत्काळ कारवाई का केली नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक पातळीवर पोलिसांच्या भूमिकेवर शंका घेतली जात आहे.
पोलिसांनी आता या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. या बनावट व्यवहारात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेतला जात आहे.