धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आणि परंडा हे दोन ऐतिहासिक वारसा असलेली शहरे आता ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहेत. एम.डी. सारख्या घातक अंमली पदार्थांचा सोलापूर, पुणे, मुंबई आणि गुजरातपर्यंत जाळं पसरलेलं आहे. प्रश्न हा आहे की, हे जाळं कोण विणतंय आणि त्याला अभय कोण देतंय?
पोलिसांचे गूढ मौन – भ्रष्ट यंत्रणेमुळे माफियांचे फावले!
तुळजापूर आणि परंड्यातल्या तरुणांना ड्रग्जच्या दलदलीत ढकलण्याचे षडयंत्र उघड होत असतानाही पोलिसांची गूढ शांतता संशयास्पद आहे. ही फक्त काही मुले किंवा टोळ्यांची कृत्ये नाहीत, तर मागे मोठे मासे आहेत! माफियांचे धागेदोरे राजकीय वरदहस्ताखाली जुळलेले असतील, तर पोलीस त्यांना हात लावणार का?
सध्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून ही ड्रग्जची खेप चालतेय. स्थानिक पोलीस यंत्रणा हे फक्त कारवाईचे नाटक करत असताना, मोठे मासे मोकळे फिरतायत. कोणाच्या आशीर्वादाने हा धंदा जोमात सुरू आहे?
सक्षम पोलीस अधिकाऱ्यांची गरज – भ्रष्ट अधिकार्यांना हटवले पाहिजे!
सध्याची पोलीस यंत्रणा भ्रष्ट आहे, हे उघड आहे. स्थानिक पातळीवर माफियांशी साटेलोटे असलेले अधिकारी कारवाईच्या नावाने फक्त वरवरची धूळफेक करतात. ही भ्रष्ट मदार साफ करायची असेल, तर या जिल्ह्यात सक्षम, निर्भीड आणि दबाव न मानणाऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी लागेल.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घालून कोणालाही न जुमानणारा, माफियांना चिरडणारा पोलिस अधिकारी इथे बसवला पाहिजे. जो सोलापूर-पुणे-मुंबई-गुजरातपर्यंत पोहोचलेल्या या ड्रग्ज नेटवर्कची मुळे उखडून टाकेल!
पालकमंत्र्यांचा अल्टिमेटम – प्रत्यक्षात काही होणार का?
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ७२ तासांत निकाल द्या असं सांगितलं आहे. पण प्रश्न असा आहे, हा “डेडलाईन गेम” पोलिसांसाठी आहे की फक्त माध्यमांसाठी?” मोठ्या मास्यांना सोडून छोटे प्यादे गजाआड करून पोलिसांनी आपली पाठ थोपटून घ्यायची का? की खरंच कोणताही फोन न ऐकणारा आणि कोणाचाही आदेश न मानणारा अधिकारी इथे येणार आहे?
धाराशिवकर सजग राहा – उद्या तुमच्या घरातही विष पोहोचेल!
ड्रग्जमुळे एक संपूर्ण पिढी बरबाद होऊ शकते. याला मिळालेल्या पोलीस आणि राजकीय अभयामुळे आज धाराशिव जिल्ह्याचा ड्रग्ज हब होत आहे. ही झोपेची वेळ नाही. स्थानिक नागरिकांनी संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवून, पोलिसांना जाब विचारला पाहिजे!
धाराशिव, तुळजापूर आणि परंड्यातील नागरिकांनो – आता आवाज उठवा, नाहीतर उद्या तुमच्या घरातील एखादा तरुण या व्यसनात अडकलेला दिसेल!
हा केवळ गुन्हा नाही, तर संपूर्ण समाजासाठी दिलेला विषप्रयोग आहे. हा विषप्रयोग थांबवायचा की डोळेझाक करायची, हे प्रशासनावरही आहे आणि तुमच्यावरही!