धाराशिव शहरात बहुप्रतिक्षित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या दिशेने महत्वाची पावले पडली आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि जलसंपदा विभागाची मोकळी जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. धाराशिवच्या तहसीलदारांनी ८ हेक्टर ३० गुंठे जागा शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा डोमकुंडवार यांच्या ताब्यात दिली आहे.
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गालगत असलेली ही जागा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. विद्यार्थी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सोयीच्या दृष्टीने ही जागा योग्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या जागेवर सुसज्ज इमारत उभारण्यासाठी ५१३ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ५ हेक्टर ३० गुंठे जागाही वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात आली आहे. भविष्यात या जागेवर दंत महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, भौतिकोपचार शास्त्र, फार्मसी यासारखे अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे.
जलसंपदा विभागाच्या ३ हेक्टर जागेत वसतीगृह, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने प्रस्तावित आहेत. या ठिकाणी एक अत्याधुनिक वैद्यकीय संकुल निर्माण करण्याचे नियोजन आहे.या निर्णयामुळे धाराशिव आणि परिसरातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गालगत असलेली ही जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाकरिता उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. विद्यार्थी, रूग्ण आणि रूग्णांच्या नातेवाईकांच्या दृष्टीने ही जागा सोयीची आहे. मात्र काही जणांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पोहनेर रस्त्यावरील खाणीजवळील अडगळीच्या जागेत वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व वैद्यकीय शिक्षणमंत्री .हसन मुश्रीफ यांनी याबाबत बैठक घेवून तातडीने जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास प्रत्यार्पित करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने कौशल्य विकास व जलसंपदा विभागाकडून जागेचा ताबा महसूल विभागाने शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा डोमकुंडवार यांच्याकडे सोपविला आहे.
– आ. राणा जगजितसिंह पाटील