धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कैलास पाटील यांचा उमेदवारी अर्ज सोमवार, दिनांक 28 ऑक्टोबर रोजी दाखल केला जाणार आहे. यानिमित्ताने पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांनी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
जाधव यांनी मतदारसंघात सध्या मोठी संधी चालून आल्याचे सांगितले. सामान्य कुटुंबातून आलेले नेतृत्व पुन्हा एकदा आमदार होण्याच्या दृष्टीने हे अत्यंत अभिमानाचे आहे, असे त्यांनी म्हटले. गेल्या पाच वर्षांत सामान्य जनतेसाठी काम करतानाच कोरोना काळातही जनतेची काळजी घेणारे आमदार पाटील यांनी शासकीय महाविद्यालयाची उभारणी केली, असा उल्लेख त्यांनी केला.
“या आमदारांनी खोके आणि मंत्रीपदाची संधी असूनही स्वाभिमानी बाण्याने जनतेच्या हितासाठी तडजोड केली नाही. त्यामुळे पक्षाने त्यांची निष्ठा ओळखून पहिल्याच यादीत त्यांचे नाव घोषित केले आहे. आता वेळ आली आहे की या निष्ठावंत आमदारासह उभे राहण्याची,” असे भावनिक आवाहन जाधव यांनी केले.
रॅलीसाठीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:
दिनांक: 28 ऑक्टोबर 2024, सोमवार
वेळ: सकाळी 10:00 वाजता
स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव
रॅलीचा मार्ग: अण्णाभाऊ साठे चौक – धारासूर मर्दिनी मंदिर – हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्गा – नेहरू चौक – काळा मारुती मंदिर – संत गाडगे बाबा चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.