धाराशिव जिल्ह्याला नवीन पालकमंत्री मिळाल्यानंतर राजकीय रंगमंचावर एकच हलचल झाली आहे. तानाजी सावंत यांची मंत्रीमंडळातून गच्छंती झाल्यावर मुंबईकर प्रताप सरनाईक यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सरनाईक धाराशिव दौऱ्यावर आले आणि येथेच राजकीय नाटकाचे नवीन पर्व सुरू झाले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार तानाजी सावंत यांनी अनुपस्थिती दाखवली, तर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी सरनाईक यांच्यासोबत गप्पा, हास्यविनोद करून वेगळाच संदेश दिला.
त्यातच ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटणार असल्याच्या अफवांमुळे वातावरण अधिकच तापलं. खासदार ओमराजेंना महायुतीत येणार का, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी केवळ स्मितहास्य दिलं. सरनाईक यांनी लगेचच “ओमराजे महायुतीचेच” असल्याचा दावा केला, त्यामुळे चर्चेला उधाण आलं.
दुसरीकडे, आमदार कैलास पाटील यांनी मात्र हा दावा धुडकावून लावत, “उद्धव ठाकरेंसोबतच होतो, आहोत आणि राहणार!” असा ठाम निर्वाळा दिला. संघर्ष करत शिवसेना मजबूत करण्याचा मंत्र देत त्यांनी चर्चेचा नवा पट उघडला.
आता शिवसैनिकांना प्रश्न पडला आहे, “ओमराजे स्मितहास्य करत कोणता डाव मांडत आहेत?” आणि “सरनाईकांचे हास्य म्हणजे महायुतीचा विजय की नव्या गोंधळाची सुरुवात?” धाराशिवच्या राजकीय रंगमंचावर पुढे काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Video