धाराशिवच्या राजकीय रंगमंचावर तानाजी सावंत नावाच्या नाट्यमय पात्राने पुन्हा एकदा जोरदार प्रवेश केला, पण यावेळी ते थोडे ‘कोमात’ वाटत आहेत! परंड्याचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना मंत्रिपद गेल्यापासून “राजकीय हृदयविकाराचा झटका” बसला आहे, असे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
महायुती सरकार स्थापनेनंतर सावंतांचा “राजकीय पत्ता कट” झाला आणि त्यांनी परंड्याला सरळ “गुडबाय” मारले. मतदारांनी निवडणुकीत 1500 मतांनी त्यांना विजयी केलं, पण मंत्रिपद गेल्यावर सावंतांची “चाल” मंदावली आहे. धाराशिवचे नवे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील पहिल्या जिल्हा नियोजन बैठकीला सावंत उपस्थित नव्हते.
सरनाईक यांनी सावंत यांच्या नाराजीवर चिमटा काढत “राजकीय खुर्ची फेविकॉल लावून उभी राहत नाही, ती कधीही बदलू शकते”, असे सूचक विधान केले. यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.
दरम्यान, बैठकीत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे सरनाईक यांच्यासोबत चांगलेच “हास्यविनोद” करताना दिसले. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गट फूटणार का, अशी चर्चा रंगली. सरनाईक यांनीही “आधीचं काही सांगता येत नाही, वेळच सांगेल!” असे विधान करत या चर्चेला उधाण आणले.
सावंतांनी परंड्याला पाठ फिरवल्यानंतर त्यांच्या नाराजीचा “सावंतांच्या सावलीतला” राजकीय अध्याय सुरू झालाय, असे दिसते. आता त्यांची “कोमा” संपून ते राजकीय धक्का देतील की, आणखी नाराजीच्या “पडद्याआड” जातील, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे!
बाईट ऐका