धाराशिव: शहरातील शिवनेरी नगर सांजा रोड येथील रहिवासी सोनी विजयकुमार गुंड यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने दीड लाखाच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना घडली आहे. ही घटना १८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी बारा या वेळेत घडली.
सोनी गुंड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कडी उघडून आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले १,८१,००० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३३१(३), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशीतून प्रवासादरम्यान अडीच लाखाची चोरी
वाशी: लातूर येथील श्रीकांत विठ्ठलदास हेड्डा (वय ५७) यांच्या मुलीच्या आणि नातेवाईकांच्या बॅगेतून अज्ञात चोरट्याने २,४४,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना १४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास येडशी टोलनाका ते देवनारायण हॉटेलजवळील इंडियन ऑइल पेट्रोल पंप दरम्यान घडली.
श्रीकांत हेड्डा हे त्यांच्या मुलीसह नातेवाईकांसह प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या ट्रॅव्हल्स वरील बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्याने लंपास केली. हेड्डा यांनी १८ डिसेंबर रोजी वाशी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कळंबमध्ये एअरटेल टॉवरवरील उपकरणे चोरी
कळंब: हावरगाव व शेरेगल्ली येथील इंडस टॉवरवरील एअरटेलचे उपकरणे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. १२ जुलै २०२४ ते ६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ही चोरी झाली असून, चोरट्यांनी दोन अॅझना कार्ड, जंपर केबल, सीप्री केबल असा २०,००० रुपये किमतीचा माल चोरून नेला आहे.
याप्रकरणी महादेव पंडीत ढवण (वय ४०, रा. खंडाळा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.