धाराशिव – आ. सुरेश धस यांचा खासगी पीए असल्याचा बनाव करणारा आणि सरकारी अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिकांना धमकावून वसुली करणारा आशिष विसाळ पुन्हा चर्चेत आला आहे. काही दिवसापूर्वीच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा पर्दाफाश करत भररस्त्यात चोप दिला होता. त्यानंतर आ. सुरेश धस यांनी “आशिष विसाळशी माझा कोणताही संबंध नाही” अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे हा वसुली एजंट पुन्हा सक्रिय झाला असून, तो सध्या मुंबई मंत्रालय परिसरात मुक्त संचार करत असल्याचे दिसत आहे.
धस यांचा संबंध नाही, मग विसाळ मंत्रालयात कसा?
याबाबत सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, एका आमदाराने स्पष्टपणे संबंध नाही असे जाहीर केल्यानंतरही हा तथाकथित पीए मंत्रालय परिसरात कसा वावरत आहे? तो कोणाच्या आदेशावर मंत्रालयात येतो? त्याला कोणाचा पाठिंबा आहे? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
आमदारांच्या लेटरपॅडचा गैरवापर?
सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात आ. सुरेश धस यांच्या लेटरपॅडवर तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे समजते. जर आ. सुरेश धस यांनी विसाळशी संबंध तोडले होते, तर त्यांचा लेटरपॅड त्याच्या हाती कसा लागला? आणि त्याचा वापर करून प्रश्न कसे विचारले गेले?
अवैध वसुलीचा काळा इतिहास
आशिष विसाळ हा दोन वर्षांपूर्वी धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार असताना आ. सुरेश धस यांच्या संपर्कात आला. त्याने स्वतःला त्यांच्या खासगी पीए म्हणून दाखवून अधिकारी, नगरपालिका कर्मचारी आणि व्यावसायिकांना धमकावून वसुली सुरू केली.
त्याच्या कारनाम्यांमध्ये –
✔ अवैध बांधकामांना धमकावून पैसे उकळणे
✔ नगरपालिका भ्रष्टाचाराच्या नावाखाली लोकांना ब्लॅकमेल करणे
✔ सरकारी अधिकाऱ्यांना ‘तुमचा हरीकल्याण येळगट्टे करू’ अशी धमकी देऊन खंडणी वसूल करणे
हे प्रकार समोर आले आहेत.
सरपंच हत्या प्रकरणाच्या नावाखाली खंडणीचा प्रयत्न
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याच्या नावाखाली सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून खंडणी मागण्याचा प्रकारही विसाळने केला. मात्र, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहाथ पकडून जबर मारहाण केली.
याच्या मागे मोठे ‘सामर्थ्यवान’ हात?
आशिष विसाळचा मंत्रालय परिसरातील मुक्त वावर कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, हा मोठा प्रश्न आहे. ज्या आमदाराने संबंध नाही असे जाहीरपणे सांगितले, त्याच्यासाठी हा व्यक्ती कसा आणि का काम करत आहे?
पोलिस आणि प्रशासनाने त्वरित कारवाई करावी
धाराशिव आणि बीड जिल्ह्यात सरकारी यंत्रणांना ब्लॅकमेल करून आर्थिक फायद्यासाठी गैरवापर करणाऱ्या या भामट्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. जर वेळीच उपाययोजना झाली नाही, तर हा प्रकार आणखी गंभीर होऊ शकतो.