धाराशिव: शहरातील ख्वॉजा शमशोद्दीन गाजी दर्ग्याच्या उर्समध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याचा आरोप होत आहे. अनेक दुकाने, खाद्य स्टॉल्स आणि मनोरंजनात्मक खेळणी परवानगीशिवाय उभारण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, राज्य महामार्गावर देखील सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी नसताना दुकाने थाटण्यात आली आहेत आणि अवैधरित्या भाडे वसूल केले जात आहे.
दरवर्षी उर्स दरम्यान मोठ्या संख्येने भाविक दर्ग्याला भेट देतात आणि या निमित्ताने व्यापारी दुकाने, पाळणे आणि स्टॉल्स उभारतात. वक्फ बोर्डाच्या नियमानुसार दुकानांसाठी विशिष्ट आकार आणि अंतर ठरवून देण्यात आले आहे, परंतु या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे.
राज्य महामार्गावर दुकाने उभारण्यास परवानगी नसतानाही ठेकेदारांनी मनमानी करत दुकाने उभारली आहेत आणि अवैधरित्या भाडे वसूल केले आहे. पाळण्यांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पाळण्यांसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या घेतल्या गेल्या आहेत की नाही, याबाबत शंका आहे.
या सर्व अनियमिततांबाबत जिल्हा वक्फ अधिकारी आमेर सय्यद यांना जबाबदार धरण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.