धाराशिव – हिंगळजवाडी येथील शेत गट क्रमांक 220 मध्ये सामाईक बाभळीच्या झाडाच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या तक्रारीनुसार, ज्ञानेश्वर देशमुख यांना सिध्देश्वर सावंत, गणेश सावंत आणि बजरंग सावंत यांनी झाड तोडू नका असे म्हणण्यावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, काठी आणि लोखंडी पाईपने मारहाण केली. यात ज्ञानेश्वर देशमुखांसह त्यांचे वडील बाबासाहेब देशमुख, चुलते राजकुमार देशमुख आणि चुलत भाऊ शाम देशमुख जखमी झाले.
दुसऱ्या तक्रारीनुसार, बिभीषन सावंत यांनी दिलेल्या तक्रारीत ज्ञानेश्वर देशमुख, शाम देशमुख, बाबासाहेब देशमुख आणि राजेंद्र देशमुख यांनी त्यांना आणि त्यांचे भाऊ सिध्देश्वर सावंत यांना झाड तोडल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली.
दोन्ही तक्रारींमध्ये आरोपींवर भा.न्या.सं. कलम 118(1), 115, 352, 351(2), (3), 3(5) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ढोकी पोलीस पुढील तपास करत आहेत.