धाराशिव – येथील ख्वाजा शमशोद्दिन गाजी यांचा ७२० वा उरुस सुरू झाला आहे. देशभरातून भाविक मोठ्या संख्येने या उरुसाला येत असले तरी, ठेकेदारांच्या मनमानीमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. उरुसात ठेकेदारांनी अतिक्रमण करून दुकाने भाड्याने दिल्याने व्यापाऱ्यांकडून वस्तूंचे दर वाढवले जात आहेत. याचा फटका भाविकांना बसत आहे.
दर्गाह समोरील राज्यमार्ग २०३ वर ठेकेदाराने अतिक्रमण करून वक्फ बोर्डाची जागा नसतानाही दुकाने भाड्याने दिली आहेत. जिल्हा प्रशासन यावर अनेक वर्षांपासून बघ्याची भूमिका घेत आहे. वक्फ बोर्डाच्या जागेवर उरुस भरवला जातो, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत तात्पुरती दुकाने उभारून ठेकेदार व्यापाऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत आहेत. यामुळे व्यापारी वस्तूंचे दर वाढवून नफा कमावत आहेत, ज्याचा थेट परिणाम भाविकांच्या खिशावर होत आहे.
वक्फ बोर्डाच्या जागेतील दुकानांचे भाडेही नियमापेक्षा जास्त आकारले जात आहे. एका छोट्या दुकानासाठी १२०० रुपये आणि पलंगासाठी ४०० रुपये दर असताना, व्यापाऱ्यांकडून काही हजार रुपये उकळले जात आहेत. याबाबत जिल्हा वक्फ बोर्ड अधिकारी आमेर सय्यद यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.
पाळण्याचे नियम धाब्यावर
उरुसातील आकर्षण असलेल्या पाळण्यांच्या कंत्राटातही नियम धाब्यावर बसवले जात आहेत. वक्फ बोर्डाने यावर्षीचे पाळण्याचे टेंडर १८ लाख ५१ हजार ९९९ रुपयांना दिले असून, सुरक्षिततेच्या नियमांचे पालन झाले नसल्याचे बोलले जात आहे. मुस्लीम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशनने याबाबत तक्रार केली असून, पाळण्यांची सुरक्षितता, वजन क्षमता, माती परीक्षण आदी बाबींची तपासणी करण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाकडून दुर्लक्ष
अतिक्रमण, जास्त भाडे आणि पाळण्यांच्या सुरक्षिततेबाबत तक्रारी असतानाही जिल्हा प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.